स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला धक्कादायक वळण मिळालेले आहे. गौरी आणि तिच्या होणाऱ्या बाळावर मोठं संकट कोसळलं आहे. गौरी आणि बाळ दोघांची अवस्था खूपच क्रिटिकल असल्याने या दोघांनाही आम्ही वाचवू शकत नाही. परंतु आता या संकटातून देवीच त्यांना सुखरूप वाचवू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर शालिनी भलतीच खुश झालेली असली तरी माई आणि जयदीप खूपच हताश होतात. आपल्या होणाऱ्या बाळाला आणि गौरीला वाचवण्यासाठी जयदीप एक व्रत करतो. जयदीपचं हे व्रत पूर्ण होते न होते तोच आता देवी आई प्रसन्न होऊन बाळ आणि गौरीला वाचवणार आहे.
देवी आईच्या भूमिकेत आता एका अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे निशा परुळेकर, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी बनून मालिकेत एन्ट्री घेत आहे. गौरीच्या रक्षणासाठी ती पुन्हा एकदा प्रकट झाल्याने गौरी आता या संकटातून सुखरूप सुटणार असा निश्वास मालिकेच्या प्रेक्षकांनी टाकला आहे. ऐन नवरात्रीच्या दिवसात मालिकेचे हे शूटिंग कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात नुकतेच पार पडले. यावेळी मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी देखील हजेरी लावली होती. महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीत निशा परुळेकर हिचे देवीच्या रूपातील गेटअप पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटत होतं. मालिकेतून गौरीच्या रक्षणासाठी देवी आई विविध रूपातून प्रकट झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
विशेष म्हणजे नवरात्रीच्या दिवसात देवीआईचा गेटअप करणं आणि ती भूमिका जगणं हे मोठ्या भाग्याचं काम आहे. हि भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल निशाने महेश कोठारे यांचे आभार मानले आहेत. करिअरच्या सुरुवातीला तिने प्रमुख नायिकेच्या भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. आम्ही चमकते तारे, रमाबाई भिमराव आंबेडकर, बाबो, पारख नात्यांची, चालुद्या तुमचं, प्रेमाचे नाते. तीन बायका फजिती ऐका, प्राईम टाईम, श्यामची शाळा या तिच्या महत्वपूर्ण भूमिका असलेले काही मराठी चित्रपट आहेत. दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेतन निशाने महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका साकारली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत ती पुन्हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.