दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला पाहायला मिळाला. एक नवी सुरुवात असे म्हणत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सविता मालपेकर, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गार्गी फुले यांनी पक्ष प्रवेश स्वीकारला. खरं तर सविता मालपेकर यांनीच गार्गी फुले यांना तशी ऑफर देऊ केली होती. पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारल्यावर मी सविता मालपेकर यांना होकार कळवला असे गार्गी फुले यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. यावेळी राजकारणातील प्रवेशाबाबत त्यांना विचारले असता गार्गी फुले म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी पक्षाच्या विचारसरणीची आहे.
माझे बाबा ज्या विचारसरणीचे होते जी तत्व त्यांनी आम्हाला घालून दिली होती. एक वडील म्हणून त्या तत्वांना न्याय कोणी देणार असेल तर ते राष्ट्रवादीशिवाय दुसरा कोणी नसेल. राष्ट्रवादीत काम करायला मला निश्चितच आवडेल. पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमचे बाबांचे मैत्रीचे नाते जुळले होते. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले. गार्गी फुले पुढे असेही म्हणाल्या की, तरुण लोक राजकारणात उतरत नाहीत. मला असं वाटतं की फक्त किनाऱ्यावर बसून होत नाहीत. गोष्टी त्या प्रवाहात उतरूनच तुम्हाला काम केलं पाहिजे, म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. आता पक्ष ठरवेल मी किती योग्य आहे ते तशा प्रकारची जबाबदारी ते माझ्यावर सोपवतीलच. तरुणांनी राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे. बदल घडवून आणायला हवेत अशांनी जरूर राजकारणात उतरावे.
असे मत गार्गी फुले यांनी व्यक्त केले. दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या महिन्यात त्यांच्या नावाने ‘निळू फुले सन्मान’ हा पुरस्कार अभिनेते सचिन खेडेकर यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथमच बाबांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतोय ही गोष्ट गार्गी फुले यांच्यासाठी मोठ्या अभिमानाची ठरली होती. निळू फुले खऱ्या आयुष्यात कसे होते, त्यांचा जीवनप्रवास नेमका कसा घडला. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवे, यासाठी गार्गी फुले बायोपिक बनवत आहेत. केवळ बाई वाड्यावर या डायलॉग पुरते ते मर्यादित नव्हते, त्यांनी दिलेली माणुसकीची शिकवण न विसरण्यासाखी आहे. त्यांची खरी ओळख व्हावी अशी माझी ईच्छा आहे असे गार्गी फुले म्हणाल्या होत्या. सध्या हे बायोपिक बनवण्याचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे या बायोपिकची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.