काही मोजक्या मालिका साकारून प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. मन उधाण वाऱ्याचे या लोकप्रिय मालिकेत नेहा प्रमुख भूमिकेत झळकली होती. मालिकेत तिने गौरीची भूमिका गाजवली होती. कश्यप परुळेकर आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. अजूनही चांद रात आहे ही आणखी एक मालिका तिने अभिनित केली. मोकळा श्वास या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले होते. गडबड झाली या चित्रपटानंतर नेहा ईशान बापट सोबत विवाहबद्ध झाली. १० जुलै २०१८ मध्ये कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत नेहा आणि ईशानचा साखरपुडा पार पडला होता.
त्यानंतर २ मार्च २०१९ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. लग्नानंतर नेहा तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. अर्थात यानंतर नेहा अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली असली तरी ती आता एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवत आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊनही नेहाने आपल्या शिक्षणाकडेही लक्ष्य दिले आहे. नुकतेच नेहाने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली आहे. पदवी मिळवण्यासाठी मला माझ्या कुटुंबियांची देखील साथ मिळाली असे ती आवर्जून म्हणताना दिसते. नेहा म्हणते की, दोन वर्षांच्या मेहनतीनंतर मी ही पदवी मिळवली आहे याचा मला आनंद आहे. जवळपास एक दशक मी अभिनेत्री म्हणून काम केलं त्यानंतर वेगळ्या देशात येऊन नवीन कॅरियर सुरू करणे अजिबात सोपे नव्हते.
माझ्यासाठी ही एक रोलर कोस्टर राईड आहे, परंतु मी जिथे पोहोचले त्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या आई आणि बाबांचे आभार. काही दिवस जेव्हा मला माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या कारकिर्दीबद्दल मला अनाकलनीय वाटले. तुमच्या माझ्यावरील याच विश्वासाने मला पुन्हा खंबीर केले. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या भावाला आणि माझ्या नवऱ्याला कशी विसरेल. या सर्वांसाठी तुमचे मनापासून आभार! परदेशात स्थायिक झालेल्या नेहाने आपल्या लूकमध्ये देखील बदल केलेला आहे. दहा वर्षाच्या अभिनय क्षेत्राच्या कारकीर्दीनंतर नेहा आता शिक्षिकेची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. नेहाला या नवीन वाटचालीसाठी तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.