स्टार किड्स हा विषय मीडिया माध्यमातून नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात? कशी दिसतात? याचे कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जवळून अनुभवता येणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अशा स्टार किड्सच्या फॅनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मराठी कलाकारांची मुलं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून टीव्ही वाहिन्यांवर झळकली आहेत. किचन कल्लाकार, चला हवा येऊ द्या या मंचावर सेलिब्रिटींना त्यांच्या कुटुंबासोबत आमंत्रित करण्यात येते. यावेळी बरीचशी कलाकार मंडळींची मुले प्रेक्षकांना भावलेली दिसून आली.
गायक राहुल देशपांडे याची लेक रेणुका देशपांडे हि देखील सोशल मीडियावर हिट ठरली आहे. आपल्या वडिलांसोबत तिचे अनेक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळाली आहेत. किचन कल्लाकारच्या मंचावर देखील रेणुकाने हजेरी लावून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. नुकतेच राहुल देशपांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत नाना पाटेकर यांची भेट घेतली. नाना पाटेकर सध्या चित्रपटातून फारसे दिसत नसले तरी ते एक विरंगुळा म्हणून आपल्या शेतात वेळ घालवताना आणि तिथे राबताना दिसतात. नाना पाटेकर यांचा पुण्यातील खडकवासला परिसरात २५ एकरचा प्लॉट आहे. यात त्यांनी साजेसं फार्महाऊस देखील बांधलेलं आहे. उरलेल्या जागेत ते शेती करतात. यातून मिळालेल्या उत्पन्नातून ते गोरगरीब मजुरांना आर्थिक सहाय्य देऊ करतात.
काही दिवसांपूर्वी मजुरांना मटण खाऊ घालतानाचा नानांचा एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. त्यावेळी नानांचा हा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला होता. नानांचा गणपती सेलिब्रिटी विश्वातही खूप प्रसिद्ध आहे. नाना पाटेकर आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला जेवू घातल्याशिवाय ते उपाशीपोटी जाऊ देत नाही. त्यांची ही विचारसरणी नेहमीच प्रत्ययास आलेली आहे. नानांच्या शेतातला असाच एक व्हिडिओ राहुल देशपांडे यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. रेणुका आणि नाना आजोबांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. यात नाना आजोबा रेणुकासोबत खेळताना दिसतात.
रेणुका आणि काही चिमुरडी मंडळी एका झाडावर बसलेली असताना नाना पाटेकर म्हणतात की, ‘आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत’. त्यावर उपस्थितांचा एकच हशा पिकतो. किती निखळ आनंद आहे असे म्हणत राहुल देशपांडे यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल अकाऊंटवर टाकला आहे. नात आणि आजोबांचे हे जुळून आलेले बॉंडिंग पाहून सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. चित्रपटांमधून नायक, खलनायक तसेच नाट्यसृष्टीतील नटसम्राट अशा विविधांगी भूमिका गाजविणारे नाना. आजोबा नातीच्या प्रेमाचा गोडवा तितक्याच दिलखुलास वृत्तीने मांडतात याला सर्वांनी मनापासून दाद दिली आहे.