स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुमन म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधान हिने नुकतेच हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. प्रधान कट्टा या नावाने तिने स्वतःचे रेस्टोरंट सुरू केले आहे. नम्रताचे बालपण अतिशय कष्टात गेले होते, त्यामुळे हे यश अनुभवताना मागील गोष्टी ती अजिबात विसरत नाही. नम्रताचा प्रवास नेमका कसा घडला याचा उलगडा तिने एका मुलाखतीत केला आहे. नम्रताचे बालपण कल्याण मध्ये गेले. आजोबा, आज्जी, काका, आई वडील असे त्यांचे एकत्रित कुटुंब होते. आजोबांना पेन्शन मिळायची त्यामुळे नम्रताचे लाड व्हायचे. पण जेव्हा आजोबांचे निधन झाले तेव्हा घरात आर्थिक चणचण भासू लागली.
दरम्यान काकांचे लग्न झाल्याने ते वेगळे राहू लागले. घरखर्चाला हातभार लागावा म्हणून नम्रताची आई नोकरी करू लागली. शाळेतून घरी आल्यावर दोन भावंडं, आजी यांच्याकडे तिला लक्ष्य द्यावे लागायचे. परिस्थिती एवढी वाईट होती की त्यांना लाईट बिल भरायला सुद्धा पैसे नसायचे. शाळेचा अभ्यास ती मेणबत्ती लावून करत असे. दहावी इयत्तेत शिकत असताना नम्रताच्या आईचे हर्नियाचे ऑपरेशन झाले. त्यावेळी नम्रताने जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. तिला दिवसाला ९० ते १०० चपात्या लाटायला लागायच्या. पुढे बारावीत गेल्यानंतर तिने एका ट्रॅव्हल कंपनीत नोकरी केली. याचदरम्यान तिने पार्लरचा कोर्स केला. या क्षेत्रात जम बसू लागल्याने तिने स्वतःचे सलून सुरू केले. नम्रताच्या या खडतर आणि तितक्याच प्रेरणादायी प्रवासातून पुढे चांगले दिवस येऊ लागले.
एका ओळखीने तिला चित्रपट मालिकेत काम करण्याचे सुचवले. ऑडिशन दिल्यानंतर नम्रताचे सिलेक्शन झाले. २०१८ साली स्टार प्रवाह मालिका छत्रीवालीसाठी ऑडिशन दिली. यात तिची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली. स्टार प्रवाहवरील छत्रीवालीद्वारे मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने निभावलेल्या मधुराच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी दाद दिली. पुढे नम्रताने मिसेस देशमुख या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून तिला सुमनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या मालिकेचे शूटिंग आणि प्रधान कट्टा या रेस्टोरंटची जबाबदारी सांभाळताना ती तारेवरची कसरत करताना दिसत आहे. हे यश सहजासहजी मिळाले नसल्याचे नम्रता आवर्जून म्हणते.