नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात दारू सोडण्याबाबत सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. नागराज मंजुळे ४ थी इयत्तेत शिकत होते, त्यावेळी त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील सुद्धा दारू प्यायचे त्यामुळे घरात बाटल्या असायच्या. याच बाटलीतली दारू ते पाणी न टाकता प्यायचे, मात्र वडिलांना समजू नये म्हणून हापस्याचे पाणी त्यात भरून ठेवायचे. मात्र सातवीत असताना त्यांचे हे दारूचे व्यसन कसे सुटले? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी माझा पूर्ण अभ्यास केलेला दिसतोय अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी वार्ताहराला दिली.
मात्र माझा सोडणे आणि धरणे यावर अजिबात विश्वास नाही. कुठलीही गोष्ट अति केली की हानिकारक आहे, ते वाईट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एखाद्याचे पाय दाबून दिले तर काही काळासाठी ते चांगलं वाटतं, पण मग सतत पाय दाबत राहिलं तर तो माणूस मरून जाईल. एमला तर अनेक गोष्टींचं व्यसन आहे. दारू वाईट नाही पण त्याचा अतिरेक केला की ते घातक ठरतं. अनेक जण सिगरेट ओढतात हे एक व्यसनच आहे, पण त्याची ओढण्याची स्टाईल भारी असल्यामुळे लोकांना खूप भारी वाटतं. तंबाखूचं व्यसन अनेकांना आहे, पण ते दिसायला बरं नाही दिसत त्यामुळे ही गोष्ट लपून केली जाते. पण सिगरेट ओढणं म्हणजे ती व्यक्ती मोठी आहे असे मानतात. माझे काही ओळखीतले लोक चार माणसात आले तर जवळ असलेली एकच सिगरेट दाखवून ओढतात.
एकटे असले की त्यांना सिगरेटची कधीच आठवण येत नाही. पण जोपर्यंत लोकं समोर आहेत तोपर्यंत सिगरेट पेटवायची आणि लोकं गेली की लगेच विझवायची. ह्याचा अर्थ तुम्हाला तुमची एक इमेज तयार करायची असते. माणूस अति दारू पिऊन मरतो असं म्हणतात पण तसं मुळीच नसतं. त्याच्यासोबत असलेलं दुःख पिऊन ते मरत असतं. आपण दारू सोडा म्हणून सांगतो पण त्याच्या समस्या सोडवायचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे ही गोष्ट खुप गुंतागुंतीची आहे. ह्यात मला काळं पांढरं करू वाटत नाही, माझी ती ईच्छा नाही. चित्रपटात जसं कोणालातरी व्हिलन बनवावं लागतं, मग त्यात दारूला केलं जातं. पण माणसं वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिलन असतात. दारू, सिगरेट वाईट नाही पण त्याचं व्यसन खूप वाईट आहे.