मालिकेचे, चित्रपटाचे शूटिंग असो वा आणखी काही सर्वानाच लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक मानले आहे. या लसीकरणासाठी अनेक कलाकार मंडळी टीव्ही माध्यमातून लोकांना आवाहन करताना आणि जनजागृती घडवून आणतात दिसतात. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील आपले लसीकरण झाल्याचे दाखले सोशल मीडियावर दिले आहेत. मात्र या गोष्टीला अपवाद ठरलेला अभिनेता “बिजय आनंद” याने याबाबत परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे. बिजय आनंद हा प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली खरे हिचा पती आहे.
बिजय आनंदने आजवर अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यश, प्यार तो होना ही था या चित्रपटात तो नायक तर कधी सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळाला होता. सिया के राम, औरत, आसमान से आगये, दिल ही तो है चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर बिजय आनंद यांनी आपली पावले मराठी चित्रपट सृष्टीकडे वळवली ये रे ये रे पैसा, स्माईल प्लिज सारख्या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला आहे. बिजय आनंदने लसीकरणाबाबत नुकतेच एक वक्तव्य केले आहे. तो म्हणतो की, “माझ्यासाठी माझं शरीर हे मंदिर आहे आणि कोणत्याही केमिकल्सचा त्यात मी प्रवेश होऊ देणार नाही. लसीकरण न झाल्याने मी दोन चित्रपट गमावले आहेत. सर्बियात चित्रित होणारा वेबसिरीजचा एक मोठा प्रोजेक्ट देखील मी याच कारणामुळे गमावला आहे.”
तो पुढे म्हणतो, “काही दिवसातच दुबईत मला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे मात्र तो पुरस्कार देखील मी स्वीकारणार नाही असे बिजय आनंद म्हणतो. माझ्या १४ वर्षाच्या मुलीला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी तिला लंडनमध्ये जावे लागणार आहे. मात्र माझी पत्नी सोनाली खरे आणि माझे लसीकरण न झाल्याने माझी मुलगी एकटीच लंडनला जाणार आहे. माझी पत्नी आणि मी लसीकरण करण्याच्या विरोधात आहोत, यावर आता आमचा निर्णय अगदी पक्का झाला आहे. कारण यावरूनच मोठं राजकारण केलं जात आहे. इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात माझं कुठलंही योगदान देणार नाही” असे परखड मत अभिनेता बिजय आनंद यांनी मांडले आहे.