येत्या १४ फेब्रुवारी पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “मुरांबा” ही नवी मालिका दाखल होत आहे. शशांक केतकर या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात रेवा आणि रमा या दोन मैत्रीणींच्या नात्यातील आंबट गोड मुरांबा कसा मुरणार हे पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या नायकामुळे ह्या दोन मैत्रिणींमध्ये दुरावा येणार का याची ही कहाणी असणार आहे. शशांक केतकर सोबत या मालिकेत दोन मुख्य नायिका झळकणार आहेत. ‘शिवानी मुंढेकर’ हिने या मालिकेत रमाची भूमिका साकारली आहे तर ‘निशानी बोरूले’ हिने रेवाची भूमिका निभावली आहे.

शिवानी मुंढेकर ही मूळची कराडची. इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमी सहभागी व्हायची. नृत्याची देखील तिला विशेष आवड आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज तिने पोस्ट केले आहेत यातूनच तिला प्रसिद्धी मिळाली आहे. मुरांबा ही तिची पहिलीवहिली टीव्ही मालिका आहे. त्यामुळे शिवानीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. या मालिकेत रेवाची भूमिका अभिनेत्री निशानी बोरूले साकारणार आहे. निशानी बोरूले हिने ‘हिरकणी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय थंडा बुखार या हिंदी भाषिक म्युजिक व्हिडीओ अल्बममध्ये ती झळकली आहे. एक दाक्षिणात्य जाहिरातीत देखील निशानीने काम केलं आहे.

मुरांबा ही निशानीची पहिलीच मराठी मालिका असणार आहे. या मालिकेअगोदर अंजन टीव्ही वरील ‘चुलबुली चाची’ या हिंदी मालिकेतून महत्वाची भूमिका बजावली होती. मुरांबा ही मालिका ट्रायअँगल लव्ह स्टोरी असणार आहे. मालिकेचा नायक रेवाच्या प्रेमात असतो मात्र रेवाची मैत्रीण रमा ही नायकाच्या प्रेमात पडलेली पाहायला मिळते. नायकाच्या आगमनाने रेवा आणि रमा यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करणार का हे मालिकेतुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १४ फेब्रुवारी २०२२ पासून दुपारी १.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी शशांक केतकर, शिवानी मुंढेकर आणि निशानी बोरूले यांना मनपूर्वक शुभेच्छा.
