मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे किरण माने यांना मालिकेच्या निर्मात्यांनी बेदखल केलं आहे. राजकीय वादग्रस्त पोस्ट आणि मालिकेच्या महिला कलाकारांसोबतचे गैरवर्तन यामुळे किरण माने यांना गेल्या वर्षभरापासून निर्माती टीमने नोटीस दिली होती. पण तरीही सेटवरची वागणूक आणि मी पणा किरण माने यांच्या अंगलट आला. आणि याचा शेवट त्यांना मालिकेतुन काढण्यात आले. अर्थात काही कलाकारांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मालिकेने घेतलेला निर्णय त्यांच्या पोस्टरवर देखील पाहायला मिळाला. मालिकेच्या नव्या पोस्टरवरून किरण माने यांना काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते या मालिकेचा हिस्सा नसणार हे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे विलास पाटीलची भूमिका आता कोण साकारणार? असे प्रश्न प्रेक्षकांसमोर उपस्थित राहिले होते. कारण किरण माने यांनी आपल्या अभिनयाने रंगवलेली विलास पाटीलची भूमिका साकारण्यासाठी तितक्या ताकदीचा कलाकार हवा होता. ही भूमिका आता अभिनेते आनंद अलकुंटे साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दमदार भूमिका आनंद अलकुंटे त्यांच्या अभिनयाने गाजवतील असा विश्वास आहे. आनंद यांनी स्वराज्यरक्षक संभाजी, रुद्रम, गर्जा महाराष्ट्र, बंदिशाळा, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई, क्लास ऑफ ८३ अशा हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिकेतून दमदार भूमिका निभावल्या आहेत. चला वाचू या अभिवाचन कार्यक्रमातून त्यांनी सादरीकरण केले होते. अभिनयात त्यांचे पदार्पण झाले ते ओघानेच.
दहावीच्या परीक्षेनंतर प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात त्यांनी प्रवेश घेतला. यादरम्यान हॉटेल मॅनेजमेंटची पदवी आणि पुणे विद्यापीठातुन एमबीएचे शिक्षण त्यांनी घेतले. रंगभूमीशी जोडले गेल्याने पृथ्वी थिएटरला जाण्याचा योग यायचा यातूनच हिंदी नाटकांमधून काम करण्यासाठी संधी मिळाली. पुढे मराठी मालिका आणि चित्रपट तसेच हिंदी भाषिक चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आता स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत ते विलासची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आनंद अलकुंटे यांनी आजवर अनेक दमदार भूमिका गाजवल्या आहेत. ते ही भूमिका उत्कृष्ट निभावतील याची प्रेक्षकांना देखील खात्री वाटत आहे. या हटके भूमिकेसाठी आनंद अलकुंटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा.