हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “मिथुन चक्रवर्ती” यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव आहे गौरांगो चक्रवर्ती १६ जून १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. बीएस्सी केमिस्ट्री विषयाची पदवी मिळवली. परंतु मधल्या काळात त्यांची पावले नक्षलवाद्यांकडे वळली. परंतु या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाला नक्षलवाद्यांच्या आंदोलनात करंट लागून जीव गमवावा लागला त्यावेळी नक्षलवाद्यांपासून दूर राहणे यातच आपले भले आहे ते त्यांना कळून चुकले. शेवटी मागील सर्व विसरून मिथुनदा पुण्यात येऊन दाखल झाले. इथे येऊन त्यांनी एफटीआयआय मध्ये अभिनयाचे धडे गिरवले.
१९७६ साली मृणाल सेन दिग्दर्शित “मृगय्या” या बॉलिवूड चित्रपटात मिथुनला प्रथमच अभिनयाची संधी मिळाली. ह्या चित्रपटात त्यांनी निभावलेल्या घिनुआ या पात्राचे मोठे कौतुक झाले. पदार्पणातील त्यांचा हा पहिलाच चित्रपट अगदी सुपरडुपर हिट ठरला, त्यानंतर मिथुनला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र एवढे यश मिळवूनही त्याला कुठेच काम मिळेनासे झाले. पर्यायाने काम मिळवण्यासाठी आणि पोटाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर आपल्याला आता चित्रपट मिळतील असे वाटणे साहजिक होते पण झाले उलटेच, एकही चित्रपट मिळत नव्हता की छोट्या मोठ्या भूमिका त्याला मिळणे कठीण झाले होते.
हाताला काम नाही त्यामुळे राहण्याचे आणि जेवणाचे प्रचंड हाल होऊ लागले. कधी कुठे तरी मित्राकडे राहणे, वेळप्रसंगी फुटपाथवर झोपणे, स्टुडिओचे उंबरठे झिजवणे हा त्याचा रोजचा संघर्ष चालूच होता. वेळप्रसंगी कधी कधी उपाशी देखील राहावे लागले. आकाशवाणीवर त्यांचा एक किस्सा खूपच वायरल झाला, कोण्या एका पत्रकाराला वाटले की आपण राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नव्या कलाकाराचा इंटरव्ह्यू घ्यायचा. त्या पत्रकाराने मिथुनला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला सगळीकडे शोधले पण हा कुठेच सापडायचा नाही. कारण तो नेमका कुठे राहतो याचा ठावठिकाणा कुठेच लागत नव्हता. कोणी सांगायचे हा इथे भेटला होता तर तो पत्रकार तिथे जायचा, कोणी सांगायचं आज हा इकडे दिसला तर पत्रकार तिकडे जायचा मात्र दरवेळी त्या पत्रकाराला निराशाच येऊ लागली.
शेवटी एका स्टुडिओच्या बाहेर झाडाखाली मिथुन त्या पत्रकाराला दिसला. पत्रकाराने विचारले तुमचा interview हवा आहे… तर मिथुनला वाटले हा आपली गंमत करतोय. मिथुन त्या पत्रकाराला बराच वेळ टाळत होता. शेवटी interview द्यायला तो तयार झाला… मात्र एका अटीवर… “स्टुडिओच्या कॅन्टीनमध्ये जेवायला देशील का? मी दोन दिवस झाले उपाशी आहे”
पत्रकाराने त्याची लगेचच मान्य केली आणि थेट बाहेरील एका चांगल्या हॉटेल मध्ये त्याला घेऊन गेला आणि त्याला पोटभर जेवू घातले आणि पुढे त्याचा हा interview सुद्धा छानसा लिहिला गेला.
नंतर मग मिथुनने हे दिवस पुन्हा कधीच पाहिले नाहीत हे विशेष… डिस्को डान्सर चित्रपटानंतर मिथुन दा हे नाव सुपरडान्सरच्या भूमिकेत बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रिय होऊ लागले. आज मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आकाशवाणीवर त्यांच्या बाबत घडलेल्या या घटनेची आठवण करून देण्यात आली होती. सर्वांच्या लाडक्या मिथुन दा ला कलाकार.इन्फो च्या टीमतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.