माझी तुझी रेशीमगाठ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. एका आठवड्यातच या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत परीची भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली पाहायला मिळत आहे. परीचा निरागसपणा आणि तिचा समजूतदारपणा प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या मालिकेत नेहा आणि परिच्या घरा शेजारी एक जोडपं राहत असलेलं दर्शवलं आहे. नेहा ऑफिसमध्ये गेल्यावर हे काका-काकू परीची काळजी घेताना दिसतात. काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जवळपास ५ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करताना दिसत आहेत. आज त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “मानसी मागिकर”. तुम्हाला आठवत असेल २०१४ ते २०१६ या कालावधीत ‘का रे दुरावा’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होती. या लोकप्रिय मालिकेत देखील मानसी मागिकर यांनी काकूंचीच भूमिका साकारली होती. या मालिकेशिवाय झी मराठीचीच २०१६ सालची ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतूनही त्या महत्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. मानसी मगिकर या पूर्वाश्रमीच्या ‘विनया तांबे’. उत्तम गायिका आणि नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला कलाक्षेत्रात नाव कमावले होते. त्यांची आई सुनंदा तांबे पतीच्या निधनानंतर तीन मुलींचे पालनपोषण व्हावे म्हणून स्वेटर तयार करून ते विकण्याचा व्यवसाय करत असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी विनया तांबे विजय मागिकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या लग्नानंतर त्या ‘मानसी मागिकर’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. विजय मागिकर हे गरवारे कंपनीत आबासाहेब गरवारे यांचे पीए म्हणून काम करत होते. त्यानंतर रेव्हेन्यू कॉलनीत स्वतःच्या घरातच लिक्विड साबणाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ३० ते ३५ वर्षांचा त्यांचा हा व्यवसाय सुरू असताना त्यांनी राजदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’ हे चित्रपट आणि ‘गोट्या’ मालिका साकारली. गोट्या या लोकप्रिय मालिकेत मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका अतिशय सुरेख साकारली होती. सहदिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून गोट्या मालिकेतून तसेच पुढचं पाऊल या चित्रपटातून दोघांनी एकत्रित काम केले होते. ‘एकाच या जन्मे जणू…’ हे लोकप्रिय गाणं पुढचं पाऊल या चित्रपटातल आहे हे गाणं मानसी मागीकर यांच्यावर चित्रित झालं आहे. मानसी आणि विजय मागिकर यांना ‘वरुण’ हा एकुलता एक मुलगा आहे.
लग्न पहावे करून, हुप्पा हुय्या, हापूस, घरकुल वेबसिरीज अशा त्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे नेहमीच कौतुक झालेले पाहायला मिळते. दिसायला अतिशय देखण्या आणि तितक्याच साध्या, सोज्वळ अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जाते. मालिकेतील त्यांचे काम त्यांच्या सहकलाकारांना नेहमीच ऊर्जा देण्याचे काम करते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून त्यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन झालेले पाहून प्रेक्षक देखील खूपच खुश झाले आहेत. या मालिकेसाठी मानसी मागिकर यांना मनापासून शुभेच्छा….