ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. सायली आणि अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिल्याने ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल ठरली आहे. या मालिकेतून साक्षीची भूमिका साकारणारी मीरा जगन्नाथ हिने नुकतीच ठरलं तर मग ही मालिका सोडली आहे. मिराने या मालिकेतून काढता पाय का घेतला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र तिच्या जागी आता अभिनेत्री केतकी पालव हिची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे. केतकी पालव ही आता साक्षीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेतला हा बदल प्रेक्षकांनी स्वीकारला आहे तर अनेकांना या भूमिकेत अजूनही मिरालाच पाहायचं आहे.
अनपेक्षित बदलामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळते. तर आता या मालिकेतून आणखी एका अभिनेत्याची एक्झिट होणार आहे. मालिकेत महिपतची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांनीही ही मालिका सोडली आहे. माधव अभ्यंकर हे या भूमिकेत अगदी चपखल बसले होते त्यामुळे आता या भूमिकेत दुसऱ्या कोणाला पाहणे प्रेक्षकांना थोडे जड जाणार आहे. मात्र आता अभिनेता मयूर खांडगे महिपतच्या भूमिकेसाठी वर्णी लागलेली आहे. मयूर खांडगे हा अभिनेता म्हणून उत्तम आहे.आई कुठे काय करते, हम बने तुम बने, बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशा मालिकांमधून मयूरने विविधांगी भूमीका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. महिपतची विरोधी भूमिका तो उत्तम निभावू शकेल असा विश्वास आहे.
मयूरने साकारलेला खलनायक असो वा आई कुठे काय करते मालिकेतील शेखरची सहाय्यक भूमिका या सर्वमुळे मयूर प्रेक्षकांच्या मनात जागा बनवताना दिसला. त्यामुळे दरम्यान ठरलं तर मग ही मालिका सुरळीत सुरू असतानाच दोन कलाकारांच्या अचानक एक्झिटमुळे ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र तरीही केतकी पालव आणि मयूर खांडगे या भूमिका उत्तम निभावतील असा प्रेक्षकांना विश्वास आहे. मीरा जगन्नाथ हिने साक्षीचा खोडसाळपणा उत्तम निभावला होता. केतकी पालवचा सुद्धा विरोधी भूमिका साकारण्यात हातखंडा आहे. तर माधव अभ्यंकर यांनी निभावलेले महिपत मयूर त्याच्या अभिनयाने चांगलाच गाजवणार यात शंका नाही. केतकी पालव आणि मयूर खांडगे या दोन्ही कलाकारांचे ठरलं तर मालिकेत स्वागतच आहे असे प्रेक्षकांनीही सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.