सोनी वाहिनीवर मास्टर शेफ इंडिया या रियालिटी शोचा सातवा सिझन सुरु आहे. शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गृहिणी, विद्यार्थी, वकील, युट्युबर तसेच शेफनी प्रयत्न केले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ जणांमध्ये ७८ वर्षांच्या गुज्जू बेन नाश्तावाल्या आज्जी देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र स्पर्धेत त्यांना टिकून राहता आले नाही. शोचे परीक्षण विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि गरिमा अरोरा यांनी केलं आहे. मात्र परीक्षण करत असताना स्पर्धकांमध्ये भेदभाव केला जातोय असा आरोप परीक्षकांवर लावण्यात येत आहे. ह्या आठवड्यात शो अधिक रंगतदार होण्यासाठी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
मास्टर शेफ इंडिया सुरू झाल्यापासून सहभागी झालेल्या काही ठराविक स्पर्धकांना परिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया दिली जात आहे. तर अनेकदा कलकत्त्याच्या प्रियांका बिस्वास आणि महाराष्ट्रातील मुंबईच्या सुवर्णा बागुल यांना टार्गेट केलं जातंय असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. सुवर्णा बागुल या होमशेफ आहेत. त्यांनी कधीच कुठे नोकरी केली नाही ना की कधी त्या घराच्या बाहेर पडल्या नाहीत. मात्र मास्टर शेफमध्ये येऊन त्या वेगवेगळे पदार्थ बनवून परिक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अनेकदा त्यांच्या पदार्थांना विरोधी प्रतिक्रिया मिळत होत्या. ह्या आठवड्यात मात्र त्यांनी बनवलेल्या पदार्थाची रणवीर ब्रार यांनी स्तुती केली आहे. तमिळनाडूच्या अरुणा विजय यांच्यावर परिक्षकांची विशेष मेहरबानी असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. अरुणा विजय या जैन धर्मीय आहेत.
स्पर्धेत त्यांना एका पदार्थात अंडे वापरायला सांगितलं होतं, ते वापरण्यास अरुणा यांनी नकार दिला. या निर्णयामुळे अरुणाचं देशभर कौतुक केलं गेलं. त्यामुळे तिला मांसाहार पदार्थ बनवण्याबाबत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे एका विशिष्ट स्पर्धकावर परीक्षक स्तुती सुमने उधळत आहेत. तिलाच तुम्ही विजयी घोषित करा अशी टीका नेटकऱ्यांनी करण्यास सुरुवात केली आहे. एका ठराविक स्पर्धकाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न केले जातात असे वाटायला लागते तेव्हा अशा शोचा विजेता अगोदरच ठरलेला असतो अशी चर्चा आता जोर धरताना दिसते. केवळ सुवर्णा बागुल नाही तर कमलदीप कौर यांना देखील परीक्षकांनी विरोधी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. केवळ अरुणा विजय बाबत परीक्षक सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी आता शोवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.