काल गुरुवारी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. भावा बहिणीच्या गोड नात्याचा हा सण बॉलिवूड सृष्टीपासून टॉलीवूड ते मराठी सृष्टीतील कलाकारांनीही अगदी थाटात साजरा केलेला पाहायला मिळाला. मराठी सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भावा बहिणीसोबत फोटो शेअर केले. स्पृहा जोशीने बहीण क्षिप्रा जोशी सोबतचा फोटो शेअर करून हे सेलिब्रेशन केले. तर भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या दोघी बहिणींनी एकमेकांना राखी बांधून हा सोहळा साजरा केलेला पाहायला मिळाला. भाऊ नसलेल्या मराठी नायिका आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे करताना दिसले. तर ज्या अभिनेत्रींना भाऊ नाही त्यांनी मालिकेच्या सहकलाकारांसोबत हा सण साजरा केला.

अभिनेत्री अक्षया देवधर हिला सख्ख्या भाऊ नसल्याने तिने अमोल नाईकला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे या दोघांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मालिकेत बरकत आणि पाठकबाई दोघेही बहीण भावाचे नाते साकारताना दिसले त्यांचे हेच नाते त्यांनी प्रत्यक्षात देखील जपले असल्याने अक्षया दरवर्षी अमोल नाईकला राखी बांधते. तर मन उडू उडू झालं या लोकप्रिय मालिकेतील कार्तिक आणि मुक्ता या भावा बहिणीची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही प्रत्यक्षात रक्षाबंधन साजरे केले. कार्तिक म्हणजेच अभिनेता ऋतुराज फडके आणि मुक्ता म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता परब मालिकेतून प्रथमच एकत्र काम करताना दिसले.

आपल्याला सख्खी बहीण नाही पण प्राजक्तालाच त्याने आपली बहीण मानल्याचे तो म्हणतो. प्राजक्ताची सेटवरची एक गोड आठवण सांगताना ऋतुराज म्हणतो की, माझ्या खऱ्या आयुष्यात सख्खी बहिण नाही, पण या मालिकेत आमची मुक्ता प्राजक्ता परब हिला मी माझी सख्खी बहिण मानलं आहे. सेट वर माझी काळजी घेते. मध्यंतरी मी खूप आजारी होतो आणि तरी शूटिंग करणं गरजेचं होत. तेव्हा माझी विशेष काळजी प्राजक्ताने घेतली. घरून माझ्या साठी डबा आणणे, मेकअप रूम मध्ये माझ्या जवळ बसून राहणे. माझ्याकडे त्या दिवसात विशेष लक्ष ठेवून होती,गोळ्या घेतल्यास का? आता थोडावेळ आराम कर, अरे जास्त अंग गरम झाल आहे.
ताप वाढतोय तू आता शूटींग नको करू घरी जा, मी बोलते शेड्युलरशी. असं हक्काने सांगणारी, प्रचंड बडबड करणारी, ती इतकी जेव्हा ती आमच्या मेकअप रूम मधून जाते तेव्हा एक भयंकर शांतता पसरते. आणि मग १० मिनीटनंतर ती शांतता आम्हाला खायला उठते आणि आम्ही पुन्हा मुक्ताला आमच्या मेकअप रूम मध्ये बोलवून घेतो. की बाई बडबड कर. मन उडू उडू झालं या मालिकेच्या सेटवर ही मला बहिण मिळाली.