उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच ठाण्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात मराठी कलाकारांना देखील मोलाची मदत मिळवून दिली होती. त्या कलाकारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले. शरद पोंक्षे यांनी लिहिलेल्या ‘दुसरं वादळ’ या पुस्तकात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. शरद पोंक्षे यांना कर्करोगाचे निदान झाले त्यावेळी या कठीण प्रसंगात त्यांना कोणी कोणी मदत केली हे देखील छापण्यात आले आहे.
त्यात त्यांना मदत मिळवून दिलेल्या एकनाथ शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला आहे. आनंद दिघे साहेबांवर चित्रपट यावा अशी मंगेश देसाईची मनापासून ईच्छा होती. धर्मवीर चित्रपटाने त्यांची ही ईच्छा पूर्ण झाली. या चित्रपटाचे मंगेश देसाई यांनी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ही जबाबदारी देण्याच्या मागे एकनाथ शिंदे होते असे मंगेश आवर्जून म्हणताना दिसतात. एकनाथ शिंदे आणि मंगेश देसाई यांचे नाते किती मैत्रीपूर्ण आहे हे त्यांनी लिहिलेल्या पोस्टमधूनच स्पष्ट होते. मुख्यमंत्री पहिल्या भेटीत घाबरलेल्या मंगेश देसाई यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, आपली पहिली भेट मला आठवते साहेब, वागळे इस्टेट मध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो २००७ साली.
तुम्ही आमदार होतात त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो, पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिजीटींग कार्ड द्यायला लावलत आणि “काहीही मदत लागली तर सांगा” असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच, तीही तुम्ही एका मिनटात केलीतही. त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एका भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो. तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात “हे कशाला, आपण मित्र आहोत मंगेश.” आणि खरंच मित्र झालात. अजून एक प्रसंग आठवतो सगळे तुम्हाला नमस्कार करायचे, मी पण केला एकदा तेव्हा “हे करत जाऊ नका, आपण मित्र आहोत.” असे म्हणालात.
नंतर जसजसे वर्ष सरत गेले तसे मोठ्या भावासारखे पाठीशी उभे राहिलात प्रत्येक प्रसंगात. त्याबद्दल हृदयपूर्वक आभार साहेब. माझी २०१३ पासून मनात असलेली दिघे साहेबांवरच्या चरितपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत त्या बद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, माणसाशी माणुसकीने वागणारा. विरोधकांना नामवणारा आणि क्षमा करणारा. अहोरात काम करणारा, मी जवळून पाहिलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, महाराष्ट्र घडवण्यात तुमचा मोलाचा वाट राहो हीच दत्त गुरूंकडे प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.