कधी कोणती मालिका हिट होईल आणि त्या मालिकेला वर्षभरातच पॅकअप करावं लागेल हे सगळं काही प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद अर्थातच मालिकेची कथा किती मजबूत आहे आणि त्या कथेला खिळवून ठेवणारी टीम किती चांगली यावर मालिकेचं भविष्य ठरत असतं. मनोरंजनाच्या भाषेत सांगायचं तर टीआरपीचा आलेख खाली येऊन चालत नाही. जेव्हा ही भट्टी विस्कटते तेव्हा मालिका गुंडाळाव्या लागतात. यापूर्वीही अनेक मालिकांना हेच तंत्र न जमल्याने वर्षभरातच निरोप घ्यावा लागला आहे. असंच काहीसं झालं मन झालं बाजिंद या मालिकेच्या बाबतीत. येत्या १२ जूनला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होत असला तरी कलाकारांसाठी या मालिकेचं पॅकअप झालं.
मालिकेचं आर्थिक गणित, टीआरपीचा खेळ यापलीकडे मालिकेतील कलाकारांचं एक कुटुंब बनलेलं असतं. त्यामुळेच शेवटचा सीन शूट करताना मन झालं बाजिंद मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. गेल्या वर्षी २१ ऑगस्टला मन झालं बाजिंद या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. त्याआधी महिन्याभरापासून या मालिकेच्या प्रोमोने लक्ष वेधलं होतं. साताऱ्यातील हळद उत्पादक तरूण आणि गरीब घरातील एक हुशार मुलगी यांच्या प्रेमकथेवर या मालिकेची गुंफण करण्यात आली. रांगडा राया आणि सुंदर कृष्णा यांची प्रेमकहाणी पहिले काही दिवस रंजक वाटली, मात्र त्यानंतर या मालिकेची पकड सैल होण्यास सुरूवात झाली.
हळद कारखानदारी, गावातील राजकारण, घरातील कटकारस्थानं राया आणि कृष्णा यांच्यात सतत होणारे गैरसमज प्रेक्षकांना रूचेनासे झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी रायाच्या आजोबांची मालिकेत एन्ट्री झाली तेव्हाही मालिका सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आली. अखेर निर्मात्यांनी ही मालिका बंद होत असल्याचं जाहीर केलं. सत्यवान सावित्री या नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे मन झालं बाजिंद ऑफ एअर जाणार हे पक्कं झालं. श्वेता खरात आणि वैभव चव्हाण यांची जोडी या मालिकेत प्रथमच एकत्र आली. सातारा परिसरातील हळद व्यापारी रांगडा रायभान आणि गरीब पण हुशार कृष्णा यांच्या प्रेमावर ही मालिका. सुरूवातीला मालिकेने चांगली पकड घेतली मात्र त्यानंतर मालिका काहीशी भरकटली.
नायक नायिकांमध्ये सतत होणारे गैरसमज, घरातील व्यक्तींकडूनच होणारी कारस्थानं हा ट्रॅक प्रेक्षकांना रूचला नसल्याने मालिका टीआरपीच्या गणितात खाली गेली होती. त्यातच महिनाभरापूर्वी या मालिकेत रायाच्या आजोबांची एन्ट्री दाखवण्यात आल्यानेही या मालिकेच्या लेखनटीमला प्रेक्षकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. मालिकेत कृष्णाच्या आयुष्यात बिब्बा घालणाऱ्या गुली मावशीचं खरं रूप बाहेर काढत, कृष्णाविषयीचे गैरसमज दूर करत आजोबांचं मन जिंकत ही कथा संपवण्यात आली. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं पॅकअप होताना मात्र प्रत्येक कलाकाराचे डोळे पाणावले. रोज शूटिंगच्या निमित्ताने सेटवर दिवसातील १८ तास एकत्र असणारे कलाकार खूप भावुक झाले.