झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या या वाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून मात्र उतरती कळा लागली आहे. अर्थहीन आणि वाढीव कथानक असलेल्या मालिका हे प्रेक्षकांच्या नाराजीचे मुख्य कारण बनले आहे. त्यामुळे लोकप्रियतेच्या या स्पर्धेत आता स्टार प्रवाह वाहिनी सरस ठरलेली पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या वाढलेल्या टीआरपीमुळे आता प्रेक्षकांना दुपारी देखील नव्या मालिकांचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे ही स्पर्धा झी वाहिनीसाठी अधिक चुरशीची ठरत आहे.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनी आपल्या मालिकांमधून वेगवेगळ्या पद्धतीने ट्विस्ट आणताना दिसत आहे. परंतु मन झालं बाजींद या मालिकेचे ट्विस्ट आता प्रेक्षकांचा अंत पाहत आहेत की काय असेच चित्र सध्या दिसत आहे. मन झालं बाजींद ही मालिका गावरान बाज असलेली मालिका आहे. कृष्णा आणि रायाची प्रेमकहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कृष्णाचे रायासोबत लग्न झाले म्हणून तिला मृत्यू येणार असे भाकीत वर्तवण्यात आले होते. मालिकेच्या सुरुवातीपासून गुरुजींचे हे भाकीत सतत कृष्णाच्या जीवावर बेतताना दिसत आहे. परंतु या प्रत्येक अडचणीतून राया तिची सुखरूप सुटका करत आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही राया आणि कृष्णा आजपर्यंत एकत्र का आले नाही?
हा मोठा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना सतावत आहे. दरवेळी हे दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात पण दुसऱ्याच बाजूला त्यांच्या संसारात काहीतरी वाईट घटना घडते. या मालिकेतील वाढीव कथानक आता प्रेक्षकांच्या जिव्हारी लागलं आहे. इतके दिवस उलटूनही मालिका आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून आहे. वेगवेगळ्या युक्त्या करून कृष्णाच्या जीवावर संकट ओढवली जात आहेत. त्यामुळे कथानक पुढे सरकण्याची चिन्हच मुळात दिसेनाशी झाली आहेत. कृष्णा सीए झाली तरी ती आपल्या शिक्षणाचा कुठेच उपयोग करताना दिसली नाही. रायासोबत लग्न व्हावे अशी अपेक्षा बाळगून असलेली अंतरा हृतिक सोबत लग्न का करते?
भाऊसाहेबांचा दरारा मालिकेच्या ट्विस्टपुढे कुठेतरी कमी पडला आहे असे सतत वाटत राहते. एक आई आपल्या मुलाचा सुखी संसार का उध्वस्त करते? हे न उमगणारे एक कोडेच आहे. कृष्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून तिला घटस्फोट देणारा राया मात्र कृष्णाची साथ सोडायला तयार नाही. मालिकेतले हे एकापाठोपाठ एक येणारे ट्विस्ट आता प्रेक्षकांना गोंधळून टाकणारे आहेत. त्याचमुळे मालिकेतील कलाकार चांगले असूनही आता कथानकावर प्रेक्षकांची प्रचंड नाराजी आहे. या भरकटत चाललेल्या मालिकेने कुठेतरी थांबायला हवे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या मालिकेबाबत देण्यास सुरुवात केली आहे.