सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील ठिकठिकाणाची लोकं ही यात्रा पाहण्यासाठी बावधन येथे हजेरी लावताना दिसतात. दरवर्षी होळी पौर्णिमेला या बगाड यात्रेला सुरुवात होते. याच दिवशी कोणता व्यक्ती बगाड्या होणार हे जाहीर केले जाते. देवाला बोललेला नवस ज्याचा पूर्ण झाला असेल त्याला हा नवस फेडायचा असल्यास तो बगाडी म्हणून जाहीर केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी त्या व्यक्तीची बगाडावर लटकवून मिरवणूक काढली जाते. बावधनची ही परंपरा गेल्या कीत्येक वर्षांपासूनची आहे त्यामुळे या यात्रेला एक भावनिक रंग चढलेला पाहायला मिळतो. बगाडाची ही यात्रा प्रथमच मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली मन झालं बाजींद ही मालिका गावरान बाज असल्याने प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण वाई परिसरात होत आहे. त्यामुळे बगाड यात्रेचे दर्शन या मालिकेतून प्रेक्षकांना होणार आहे. इतिहासात प्रथमच मालिकेतून बगाड यात्रा पाहायला मिळणार असल्याने या एपिसोडची उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थात यावेळी बगाडी बनण्याचा मान मालिकेतील रायभान विधाते या पात्राला मिळालेला दाखवणार आहे. याअगोदर बगाड यात्रेचे दर्शन चित्रपटातून पाहायला मिळाले होते. केदार शिंदे दिग्दर्शित आणि संजय नार्वेकर अभिनित अग्गबाई अरेच्चा या चित्रपटात बगाड यात्रा पाहायला मिळाली होती. यावेळी बगाडीवर संजय नार्वेरकर यांना लटकवण्यात आले होते.
चित्रपटातील उधे गं अंबे उधे हे लोकप्रिय गाणं बगाड यात्रेवरच चित्रित करण्यात आलेलं होतं. असाच एक अनुभव प्रथमच छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मन झालं बाजींद या मालिकेत रायभान विधाते हे पात्र वैभव चव्हाण याने साकारलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा एपिसोड खूपच खास ठरणार आहे. या बगाड यात्रेचे एक खास वैशिष्ट्य देखील आहे. बगाडाचे वजन साधारण २ ते ३ टन इतके वजनाचे असते. बागडाला दगडाची चाके असतात यात प्रामुख्याने बाभळीच्या झाडाचे लाकूड वापरले जाते. हे लाकूड ओले असल्याने त्याचेही वजन खूप असते. हे एवढे वजन खिल्लारी बैलच पेलू शकतात. त्यामुळे बगाड उचलण्याची जोखीम याच खिल्लारी बैलांकडे दिली जाते. बावधन गावामधील सर्व सुतार समाज एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात.