आजवर महेश मांजरेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. वास्तव, कुरुक्षेत्र, पिता, रक्त, हत्यार, मातीच्या चुली, शिक्षणाच्या आईचा घो, फक्त लढ म्हणा, शाळा, काकस्पर्श, नटसम्राट, सिटी ऑफ गोल्ड अंतिम हे त्यांनि दिग्दर्शित केलेले चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. सध्या महेश मांजरेकर कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या शोची धुरा सांभाळत आहेत मात्र नुकतेच त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव जाहीर करताना त्यांनी प्रेक्षकांना एक आव्हान देखील दिलं आहे.
‘चाळी झाल्या रे सपाट, टॉवरचा थाटमाट शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले, कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले’. असे म्हणत त्यांनी “नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा”.. या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे लेखन जयंत पवार यांनी केले असून त्याचे दिग्दर्शन स्वतः महेश मांजरेकर यांनी केलं आहे. २१ जानेवारी, २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अठरा वर्षांवरील प्रेक्षकांनो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं! असे सांगून त्यांनी तमाम प्रेक्षकांना एक आव्हानच दिलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी वयाची अट लावण्यात आली आहे त्यामुळे ह्या चित्रपटात प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याची उत्कंठा नक्कीच आहे. अर्थात नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा हा चित्रपट मुळशी पॅटर्न चित्रपटाचा सिकवल असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे.
कारण चित्रपटाच्या नावासकट पोस्टरवर एक चाकू दाखवण्यात आला आहे. ‘गचकन घुसवायचा अन गरssकण फिरवायचा. आईच्या गावात कोथळा बाहेर काढायचा’ असा एक डायलॉग देखील त्यात ऐकवला जात आहे. त्यामुळे काहीतरी थ्रिलर या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे निश्चित आहे. त्याचमुळे महेश मांजरेकर यांनी आपला आगामी चित्रपट पाहण्याचे आव्हान १८ वर्षांवरील प्रेक्षकांना दिलं आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. याबाबत अधिक माहिती चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळेलच पण तोपर्यंत प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.