चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींजींच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून गोडसे या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसा हे एक तत्त्वज्ञान आणि अनुभव असून समाजाच्या सुधारणेसाठी याचा वापर होऊ शकतो असा प्रेरणादायी मंत्र देणाऱ्या गांधीजींच्या जयंती दिवशीच त्यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांच्यावर आधारित चित्रपट निर्माते संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर लवकरच घेऊन येणार असल्याचे शेअर केले आहे.
“जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं बापू – गोडसे” कधीही एवढ्या घातक वाढदिवसाच्या शुभेच्छा, यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा असे आवाहन महेश मांजरेकर यांनी केले आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली होती. नथुराम गोडसे जीवनपटावर आधारित असलेल्या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील विशेष घडामोडी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील आणि स्वातंत्र्यानंतरच्या महत्वाच्या घटना आपणास या चित्रपटाच्या माध्यमातून पहावयास मिळतील. तूर्तास चित्रपटाच्या घोषणे नंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ जनक टीका पसरत आहेत. महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांना संयम ठेवायचे आवाहन केले असून कोणाचीही प्रतिमा मोठी किंवा छोटी करण्याचा हा प्रयत्न नसून हा गोडसे यांच्या जीवनावर आधारित फक्त एकाच गोष्टीसाठीचा नाही असे स्पष्ट केले आहे..
महेश मांजरेकरयांनी आवाहन केले आहे की, “नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरूपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त कथाकथनावर विश्वास असतो. गांधींवर गोळीबार करणारा माणूस वगळता लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. त्याची कहाणी सांगताना, आम्हाला ना कुणाचे संरक्षण करायचे आहे ना कोणाच्या विरोधात बोलायचे आहे. कोण बरोबर की अयोग्य हे आम्ही प्रेक्षकांवर सोडू.” चित्रपटाची अशी वेगळी घोषणा यापूर्वी कधीही पहायला मिळाली नसल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी आणि एकंदरीत नथुराम गोडसे यांच्या वैयक्तिक जीवनावर नक्की कोणकोणत्या गोष्टी निर्माते घेऊन येणार आहे हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.