केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वीच लॉन्च करण्यात आले होते. अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. अंकुश चौधरीचा शाहीर साबळे यांच्या गेटअपमधला एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावरून अंकुश या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलेले पाहायला मिळाले. चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले असून केदार शिंदे यांनी नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग पुणे, भोर, वाई, सातारा आणि मुंबई येथे होईल असे त्यांनी जाहीर केले आहे.
या चित्रपटासाठी बालकलाकार ते ६० वर्षांच्या स्त्री पुरुष कलाकारालाही काम करण्याची संधी मिळणार आहे. ज्या कलाकारांनी नाटक, लोकनाट्य, गायन, वंदन क्षेत्रात काम केले आहे अशा स्थानिक कलाकारांची ऑडिशनद्वारे निवड करण्यात येईल. संबंधित कलाकाराला एक मिनिटाचा व्हिडीओ ऑडिशन बनवून आणि तो त्यांच्या अधिकृत इमेल आयडीवर पाठवावा लागणार आहे. यातूनच योग्य कलाकाराची निवड केली जाईल असे केदार यांनी आपल्या एका पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र या पोस्टचा कोणीतरी गैरफायदा घेऊन कलाकाराची फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. साधारण चार दिवसांपूर्वी केदार शिंदे यांनी याबाबत एक पत्रक सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
या पोस्टवरून त्यांनी कलाकारांना एक आवाहन केले आहे की, या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त आम्ही दुसरा कोणताही फोन नंबर दिलेला नाही. किंवा कोणाही अपरिचित माणसाला आम्ही या कामासाठी ठेवलं नाही. कृपया आपली फसवणूक होऊ नये यासाठी हे लिहितोय. असे म्हणत केदार शिंदे यांनी ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून कलाकाराची कुठलीही फसवणूक होऊ नये हाच याउद्देश असल्याने त्यांनी ही बाब सोशल मीडियावर सांगितली आहे. या गोष्टींमुळे कोणी व्यक्ती तुमची फसवणूक करू शकतो आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तुमच्याकडे पैशाची मागणीही करू शकतो. त्यामुळे कलाकारांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी यातून सूचित केले आहे.