देवी देवतांची अनेक मंदिरे आहेत. केवळ मंदिरातच नव्हे तर घरोघरी त्यांच्या मुर्तीची, फोटोंची पूजाअर्चा केली जाते. परंतु हो महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे दैत्याची देखील पूजा केली जाते. पुराणात देवी, देव, दैत्य यांचे अनेक दाखले पाहायला मिळतील त्यात दैत्य हे क्रूर मानले गेले. अर्थात यामागे काही अभ्यासकांचे संशोधनही प्रसिद्ध आहेत तो भाग वेगळा मात्र दैत्याची पूजा आणि त्याचे गावात असलेलं मंदिर सर्वांना आश्चर्यचकित करणारं आहे. महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या गावाबद्दल अधिक जाणून घेऊयात…
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आहे. पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगेत “निंबादैत्य नांदूर” हे गाव वसलेलं आहे. पूर्वी हा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. प्रसिद्ध भगवानगड या ठिकाणापासून हे गाव खूपच जवळ आहे. निंबादैत्य नांदूर या गावाची आख्यायिका आहे. रामायण काळाशी याची आख्यायिका जोडली गेली आहे. यात असे म्हटले आहे की, प्रभू श्रीराम सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणतात मात्र ते सीता मातेला पुन्हा जंगलात सोडून देतात. सीता मातेला दंडकारण्यात सोडून देण्याची जबाबदारी हनुमानकडे दिलेली असते. या ठिकाणाला काशी केदारेश्वर असे संबोधले जाते. तिथल्या जंगलात सीतामातेला सोडल्यावर हनुमान फळे आणण्यासाठी दूरवर जातो. एका ठिकाणी त्याला पुष्कळ फळे दिसतात ती तोडण्यासाठी हनुमान तिथे जातो. आपल्या राज्यात येऊन कोण फळे तोडतो याचा राग निंबादैत्यला येतो. हनुमानाला समोर पाहून निंबादैत्य युद्ध पुकारतो. या युद्धात हनुमान आणि निंबादैत्य दोघेही जखमी होतात. निंबादैत्य श्रीरामाचा धावा करतो हे पाहून हनुमान आश्चर्यचकित होतो. श्रीराम तिथे येताच निंबादैत्यला वर देतात की या गावात तुझेच अस्तित्व राहील… तुझीच पूजा केली जाईल. त्यावर निंबादैत्य म्हणतात की तुम्ही तर प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर असेल असा वर दिला आहे मग?…यावर श्रीराम म्हणतात की, हे गाव तुझेच आहे या गावात हनुमानाचे मंदिर नसेल… एवढेच नाही तर या नावाचा कोणी उच्चारही करणार नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे या गावात कोणीच आपल्या मुलाचे नाव मारुती, बजरंग, हनुमान असे ठेवत नाही. या गावात ७५ टक्के लोक शिक्षक असल्याचे सांगितले जाते. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व ग्रामस्थ दरवर्षी पाडव्याला होणाऱ्या निंबादैत्यच्या यात्रेला हजर राहतात. ही यात्रा तीन दिवस आयोजित केली जाते. मंदिराच्या नावे गावाने एक ट्रस्ट उभारले आहे यातून अनेक विकास कामे लेली गेली आहेत. एवढेच नाही तर इथल्या गावातून परदेशी स्थायिक असलेल्या लोकांच्या घरीही निंबादैत्याची पूजा केली जाते. निंबादैत्यच्या अख्यायिकेमुळे किंवा आलेल्या वाईट अनुभवांमुळे गावकरी हनुमान, मारुती नावाचे जावई करून घेत नाहीत. गावातील ग्रामस्थ असे सांगतात की मारुतीची चार चाकी गाडी देखील या गावात चालत नाही. एका इसमाने मुद्दामहून मारुती गाडी गावात आणली होती. ती गाडी चालू न झाल्याने तिला वेशीबाहेर ढकलत न्यावे लागले होते. गावाबाहेर गाडी गेली तेव्हा ती सुरू झाली असे इथले गावकरी सांगतात. ह्या सर्व अंधश्रद्धा वाटत असल्या तरी इथल्या ग्रामस्थांना त्या श्रध्दास्थानी आहेत. आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरूनच त्यांनी निंबादैत्याची पूजा करणे इष्ट मानले आहे. या गावाची ही परंपरा आजही अशीच अबाधित आहे त्याचमुळे महाराष्ट्रातील हे गाव आज एक वैशिष्ट्य जपणार गाव म्हणून ओळखले जाते.