आई कुठे काय करते मालिकेतून अरुंधतीच्या भूमिकेने मधुराणी गोखके प्रभुलकर हिला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्या अगोदर तिने आणखी काही चित्रपट मालिकेतून काम केले होते. मधुराणी यांचा जन्म भुसावळचा पण त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले. मधुराणीच्या आई विजया गोखले या शास्त्रीय गायिका आहेत. त्यामुळे घरातूनच तिला गायनाच्या कलेचा वारसा लाभला. आईमुळेच मधुराणी आणि अमृता या त्यांच्या दोन्ही मुलींना गायनाची आवड निर्माण झाली होती. मधुराणीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले ते वयाच्या सोळाव्या वर्षी. सी सॉ या नाटकाचे लेखन व निर्मिती केली होती.
सर्वोत्तम नाटकाचा पुरुषोत्तम करंडक पुरस्कार सी सॉ नाटकाला मिळाला होता. त्यानंतर तीने स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. २००३ साली झी मराठीवरील इंद्रधनुष्य मालिकेत तिने काम केले होते. त्याच साली गोडगुपित या चित्रपटाची तिने निर्मिती केली. तुमचं आमचं सेम असतं, नवरा माझा नवसाचा या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका निभावली. २००८ मध्ये झी मराठी वरील सारेगमप सेलिब्रिटी शोमध्ये भाग घेऊन आपल्या गायन कौशल्याची तिने चुणूक दाखवली होती. यामुळे सुंदर माझे घर हा चित्रपट तिला मिळाला होता. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमातून मुशाफिरी करत असताना मधुराणीने गायन क्षेत्रातही हळूहळू जम बसवला. अनेकदा आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला गाण्याची संधी मिळालेली आहे.
मधुराणीच्या आई विजया गोखले या शास्त्रीय गायिका आहेत. विजया गोखले यांनी शास्त्रीय गाण्याच्या अनेक मैफिली रंगवल्या आहेत. मधल्या काळात त्या गायन क्षेत्रापासून दूर राहिलेल्या दिसल्या. मात्र आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर मधुराणीच्या आई विजया गोखले यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगीतवर्धक कै कृ गो धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवारी १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे संगीत रस सुरस ही गायनाची मैफिल रंगणार आहे. या मैफिलीत विजया गोखले यांच्यासोबत राजश्री महाजनी यांची सुरेल साथ सजणार आहे. या मैफिलीत प्रेक्षकांसाठी मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे. तर काही जागा राखीव ठेवण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते.