मुंबईमध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झालेली पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रील लाईफ असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम. या दोघांनी या मालिकेत विठ्ठल आणि सुवर्णा कानिटकरचे पात्र साकारले आहे. या सुंदर जोडप्याने नुकत्याच आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. एक नवीन सुरुवात असे म्हणत लीना भागवत यांनी घर खरेदी करून आयुष्यातले हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
वयाच्या ४८ व्या वर्षी हक्काचं घर खरेदी करून लीना भागवत यांनी ही बातमी शेअर करताच सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अतिशय साध्या, सोज्वळ आणि हसमुख चेहऱ्याच्या लीना भागवत यांनी जवळपास तीन दशकं मराठी सृष्टीत काम केलं आहे. १९९६ साली अधांतर हे पहिलं व्यवसायिक नाटक त्यांनी साकारलं. त्याअगोदर हाच खेळ उद्या पुन्हा या नाटकामुळे दिग्दर्शक, अभिनेते मंगेश कदम सोबत त्यांची चांगली ओळख झाली. याच वेळी मंगेश कदम यांनी लीना भागवत यांना प्रपोज केले होते, परंतु त्यावेळी लिनाजीनी नकार दिला होता. त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत कमी करत असताना एक दिवस मालिकेतून सुट्टी काढून २०१४ साली या दोघांनी प्रेमविवाह केला.
दरम्यानच्या काळात मंगेश कदम यांचं दिग्दर्शन क्षेत्रात एक मोठं नाव होतं. त्यामुळे ते नेहमी लीनालाच आपल्या नाटकातून घेणार असा सर्वांचा समज होता. मात्र लीना भागवत त्यांच्याकडे काम करायला जाणून बुजून टाळायच्या. त्यानंतर त्या प्रायोगिक नाटकाकडे वळल्या. लग्नानंतर या दोघांनी पुन्हा एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. होणार सून मी ह्या घरची, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिकांमधुन त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. चित्रपट, मालिका, नाटक अशा प्रवासात या दोघांनी आता आपल्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. आयुष्याच्या या नवीन सुरुवातीला लीना भागवत आणि मंगेश कदम यांचे खूप खूप अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.