समंथा रूथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे केवळ दाक्षिणात्य सृष्टीतच लोकप्रिय कलाकार नाहीत तर संपूर्ण देशभरात त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत. हे दोन्ही सुपरस्टार्स कुशी या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हे काश्मीरमध्ये गेले होते. यात त्यांचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. समंथा रूथ प्रभू आणि विजय देवरकोंडा या दोन्ही कलाकारांच्या अपघाताच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांना एक स्टंट देण्यात आला होता. हा स्टंट करताना पुलावरून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला या अपघातात दोघांनाही दुखापत झाली.
समंथा आणि विजय या दोघांना प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट बोलवण्यात आले होते. दोघांच्याही पाठीला किरकोळ दुखापत झाली असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली. चित्रपटाच्या टीमने या अपघातात माहिती देताना म्हटले आहे की, चित्रपटाचे शूटिंग गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये करण्यात येत होते. पहलगाम ठिकाणी हे शूटिंग चालू होते तेव्हा या कलाकारांना दुखापत झाली. एका नदीच्या ठिकाणी कारला दोरीने बांधण्यात आले होते मात्र दुर्दैवाने ती कार खोल पाण्यात कोसळली. यात दोघेही कलाकारांच्या पाठीच्या मणक्याला मार लागला होता. मात्र घटनास्थळी प्राथमिक उपचारानंतर दोघांना हॉटेलमध्ये नेण्यात आले होते.
तिथे तज्ञ डॉक्टरांना बोलावून पुढील उपचार करण्यात आले होते. चित्रपटाचे शूटिंग काल दुपारी पूर्ण झाले असून आता ही टीम पुन्हा आपल्या घरी पोहोचली आहे. समंथा आणि विजय यांचा कुशी हा आगामी चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून या दोन लोकप्रिय कलाकारांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट देखील सुपरहिट होईल अशी अपेक्षा आहे.