चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके पडद्यावर तर कॉमेडी करतोच पण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टचीही बरीच चर्चा होत असते. नुकताच कुशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. असं आहे तरी काय या व्हिडिओमध्ये ज्याने अनेकांना हसू आवरेना झालंय. कुशल बद्रिके हे नाव जरी ऐकलं तरी त्याच्या कॉमेडी पंचने पोटात गुदगुल्या होतात. चला हवा येऊ द्या या शोमुळे घराघरात पोहोचलेल्या कुशल बद्रिकेच्या विनोदाचं टायमिंग अफलातून आहे. कुशल ऑनस्क्रिन तर विनोदाचे कारंजे फुलवत असतोच, पण तो सोशल मीडियावरही खूप व्हिडिओ पोस्ट करतो.

कधी ते व्हिडिओ गंभीर, समाजातील वास्तवावर भाष्य करणारे असतात, तर कधी विनोदाची पेरणी करणारे. त्यामुळे कुशलच्या इन्स्टापोस्टकडे त्याच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष लागून राहिलेलं असतं. कुशल आणि विजू माने यांची जोडी कायम कुठे कुठे फिरताना नेटकऱ्यांना दिसते. पांडू या सिनेमात कुशलने विजू माने यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका चोख बजावली. स्टगलर साला या वेबसीरीजच्या एपिसोडनाही प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. कुशल आणि विजू माने यांच्या जोडीचे अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना आनंद देतात. कुशलचे व्हिडिओ आणि त्याच्या कॅप्शन हे समीकरण तर अजूनच खास आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये कुशल आणि विजू माने एका रेडिमेड कपड्यांच्या शोरूम मध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. ही जोडी जेव्हा या शोरूममधील विवाह कलेक्शन विभागात येते तेव्हा तिथे हँगरला शेरवानी लावलेल्या पाहून विजू माने थांबतात. भरजरी शेरवानीकडे पाहून ते म्हणतात, किती छान आहेत हे. या शेरवानी बघून पुन्हा लग्न करावसं वाटतंय. विजू माने यांच्या याच इच्छेवर कुशलचं वाक्य पाणी फिरवतं. विजू माने यांना लग्न करावसं वाटतय हे ऐकून कुशल असं म्हणतोय की, कसं काय माणसला पुन्हा लग्नं करावसं वाटतं. असे विचार डोकावतातच कसे मनात? दैव इतकं कसं निष्ठूर असतं माणसाचं? हे वाक्य बोलून कुशल तिथून निघून जातो.
त्यानंतर विजू माने यांच्या चेहऱ्यावर मात्र असे भाव येतात की मी हे काय बोलून गेलो. तर असा हा गंमतीशीर व्हिडिओ बनवून कुशलने कमेंटचा ढीग गोळा केला आहे. खरंतर लग्नं, नवरा बायको यांच्यावर खूप विनोद होत असतात. तोच धागा पकडून कुशलने केलेली ही कमेंट आणि त्याचा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. नेटकऱ्यांनी तर हा व्हिडिओ पाहून विवाहित माणसांच्या मनातलं बोललास अशा कमेंट केल्या आहेत. कुशलला असलेला विनोदाचा सेन्सही या व्हिडिओमध्ये दिसतो.