दोन दिवसांपूर्वी रावरंभा या आगामी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मंचावर कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली. रावरंभा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. शंतनू मोघे हे पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मोनालीसा बागल ही रंभाची भूमिका साकारत आहे. किरण माने हकीम चाचा, अपूर्वा नेमळेकर शाहीन आपा, संतोष जुवेकर जालिंदर आणि कुशल बद्रिके कुरबतखान ही व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपट पुढील महिन्यात १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखक प्रताप गंगावणे यांनी कुशलची भेट घेऊन चित्रपटाचे कथानक ऐकवले.
कथानक ऐकल्यानंतर कुशल खूपच उत्साही झाला आणि मला कुठली भूमिका देणार हा प्रश्न त्याने केला. तेव्हा तू कुरबतखानची भूमिका साकारतोय हे त्याला सांगितले. तेव्हा कुशल हसून नाही मी नाही कुरबतखान, अशी प्रतिक्रिया देतो. पण ही भूमिका आव्हानात्मक असल्याने ती करायला आवडेल असा विचार करतो. कुशल या विरोधी भूमिकेबाबत असेही म्हणतो की, कुरबतखान बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तणीचा क्रूर हेर आहे. त्याला लोकांना मारायला आवडतं. अशा ग्रे शेड असलेल्या चांगल्या भूमिकेच्या मी शोधात होतो. जेव्हा माझी या भूमिकेसाठी लूक टेस्ट झाल्यावर ती भूमिका मला मिळाली. कुशलचा कुरबतखानच्या गेटअपमधला लूक पाहून प्रेक्षकांनासुद्धा हसायला येत होतं. बहुतेकदा विनोदी भूमिकेत वावरल्यामुळे त्याच्यातला मिमिक्री आर्टिस्ट कधी जागा होईल हे सांगता येत नाही.
त्यामुळे सुरुवातीला त्याच्या लुकवर प्रेक्षकांना खूप हसायला आले. मात्र मी हे आव्हान पेलणार असा विश्वास कुशलने दाखवल्याने प्रेक्षकांनी देखील त्याचं मोठं कौतुक केलं आहे. भूमिकेबाबत कुशल म्हणतो की, खरंतर ऐतिहासिक सिनेमांमध्ये “छत्रपती शिवाजी महाराजांचा” एखादा “मावळा” व्हावं. स्वराज्याच्या लढ्यात आपण स्वतःला झोकून द्यावं असं प्रत्येक मराठी नटाचं स्वप्न असतं. पण सिनेमात माझ्या नशिबात हा कुरबत खान आला. माझे डायरेक्टर अनुप जगदाळे सर यांना माझ्यात हा कुरबत दिसला आणि मग नव्या सिनेमाचा प्रवास सुरु झाला. प्रत्येक नवा सिनेमा काहीतरी शिकवून जातो, एक नवीन जीवन, नवीन अनुभव देऊन जातो. मी माझी भूमिका प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही इमान महाराजांच्याच पायाशी धाव घेत रहातं.