मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच् सांगितले जातात. त्यात अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील मैत्री ही त्यांच्या कामातही चांगली केमिस्ट्री बनू शकते. असाच किस्सा अभिनेता अतुल तोडणकर यांनी शेअर केला आहे. मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकारांचे एकमेकांशी मैत्रीचं नातं आहे. कामाव्यतिरिक्त हे कलाकार त्यांची मैत्री जपत असतात. कलाकार मित्राला पुरस्कार मिळाला की त्याचं भरभरून कौतुक करतात. नव्या नाटक आणि सिनेमासाठी शुभेच्छांचा पाऊस पाडतात. इतकच नव्हे तर एखाद्या भूमिकेसाठी छानसं नाव सुचवण्यासाठीही पुढाकार घेतात. जिवाभावाचा मित्र कायमचा सोडून गेला तर त्याच्या आठवणीने व्याकूळ होतात.

कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात. अशीच मैत्री आहे अभिनेता अतुल तोडणकर आणि दिग्दर्शक गिरीश वसईकर या दोघांची. अतुल सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत कुक्की ही भूमिका साकारत आहेत. या मालिकेला तर यश मिळालं आहेच पण अतुल साकारत असलेली कूक्कू ही भूमिकाही लोकप्रिय झाली आहे. अतुल हे विनोदी अभिनेता आहेतच पण त्यांनी अनेक सिनेमा, नाटक यामध्ये गंभीर भूमिकाही ताकदीने केल्या आहेत. अतुल हे साकारत असलेली कुक्की भूमिका कधी विनोदी तर कधी समजूतदार अशी आहे. एकत्र कुटुंबात माणसाला वेगवेगळ्या परिस्थितीत संयमानं वागावं लागतं. कुक्की या पात्रालाही असे कंगोरे आहेत.

त्यामुळे हे पात्र निभावताना अभिनेता म्हणून अतुलने कमाल केली आहे. मात्र याच भूमिकेसाठी अतुलने श्रेय दिलं आहे ते जुना मित्र आणि ठिपक्यांची रांगोळीचा दिग्दर्शक गिरीश वसईकर यांना. अतुल यांनी इन्स्टा पोस्टमध्ये गिरीश वसईकर आणि गणेश रासने यांच्या सोबतचे फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. याबद्दल अतुल यांनी असं लिहिलं आहे की, जेव्हा तुमचे जुने मित्र तुमचे दिग्दर्शक असतात तेव्हा तुमच्याकडून ते अगदी सहजपणे उत्तम काम काढून घेतात. एकाच मालिकेत हा योग जुळून आला आहे. त्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो, तुमच्यामुळेच कुक्की घडला. यावर अतुल आणि गिरीश यांच्या जिवलग मित्रांनी छान कमेंट केल्या आहेत.
अतुल आणि गिरीश यांची गेल्या २५ वर्षापेक्षा जास्त मैत्री आहे. त्यातूनच ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अतुल कॅमेऱ्यासमोर असतो तर गिरीश कॅमेऱ्यामागे. पण दोघांमध्ये मैत्रीमुळे जुळलेली केमिस्ट्री या मालिकेत कुक्कूचं पात्र यशस्वी होण्यामध्ये दिसून येते. गिरीशना काय हवंय हे अतुल यांना बरोब्बर समजतं ते त्यांच्यातील मैत्रीमुळेच. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात अशी मैत्री असेल तर त्याचा परिणाम दोघांच्याही मनातील पात्र पडद्यावर साकारणं सोप्पं होतं, तसंच काहीसं आहे. अतुल यांच्या कुक्की मुळे अभिनेता आणि दिग्दर्शक ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.