जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो, कुणी घर देता का घर, गंगाजल अशा हिंदी , मराठी चित्रपटातून अभिनय केला. आता अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपली पाऊलं दिग्दर्शनाकडे वळवली. काकन या चित्रपटाचे क्रांतीने दिग्दर्शन केले, त्यानंतर आता ती अभिनेत्री उर्मिला कोठारेला घेऊन लवकरच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. पण त्यापूर्वी क्रांती रेडकर हिचे छोट्या पडद्यावर आगमन होत आहे. येत्या १ जुलै २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन शो प्रसारित केला जात आहे. महाराष्ट्राला लोककलेचा अभूतपूर्व वारसा लाभला आहे. कलर्स मराठीच्या माध्यमातून नवीन कलाकारांना संधी उपलब्ध होत आहे.
लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान, याच लोककलेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी एक मंच उपलब्ध करून देत आहे. ढोलकीच्या तालावर या रिऍलिटी शो मध्ये लावणी कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळवून देत आहे. या शोमध्ये क्रांती रेडकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रांती सोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील आणि दिग्दर्शक अभिजित पानसे हे दोघेही परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ढोलकीच्या तालावर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीने एक वेबसाईटवर उपलब्ध करून दिली होती .त्यावर स्पर्धकांना त्यांचे लावणीचे व्हिडीओ पाठवायचे होते. यातूनच ठराविक स्पर्धक निवडण्यात येणार आहेत. तेव्हा आता हे स्पर्धक मंच गाजवण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी बनण्याचा मान कोण पटकावणार याची उत्सुकता अधिक असणार आहे. ढोलकीच्या तालावर या मंचावरून स्पर्धकांनी पुढे जाऊन मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. रिऍलिटी शो च्या माध्यमातून कलर्सच्या मंचाने सर्व कलाकारांना मोठी संधी देऊन आपले मोठे नाव मिळवून देण्यात मदत केली आहे. महाराष्ट्रातील तमाम नृत्यांगना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. क्रांती रेडकर या मंचावरून परीक्षक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परीक्षकाच्या भूमिकेतून तिचा हजरजबाबीपणा या मंचावर देखील प्रेक्षकांना लवकरच अनुभवायला मिळेल. तसेच प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांचेही मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकांना भेटणार आहे.