मराठी बिग बॉसच्या घरात असताना किरण माने यांच्या लेकीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ईशा ही किरण माने यांची लेक अभिनय क्षेत्रातच जम बसवत असल्याचे पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटलं होतं. आपल्या लेकीच्या जन्मामुळेच आपण अभिनय क्षेत्रात आलो हा किस्सा सांगताना किरण माने म्हणतात की, तो दिवस अजून लख्ख आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता जाता हाॅस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली, गोड हसली माझ्याकडं बघून. मनात विचार आला ही मोठी झाल्यावर “तुझे बाबा काय करतात?” या प्रश्नाचं काय उत्तर देईल? म्हणेल, ते दुकानदार आहेत.
ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात.” माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला! म्हन्लं नाय नाय, मला ही ओळख नको. माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात ‘अभिनय’ आहे. कितीही संकटं येऊदेत, काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे “माझे बाबा ॲक्टर आहेत”, अस्वस्थ झालो. सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली. स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती. विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला. खण्ण्णकन, मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं, कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती. दुकानात येऊन बसलो, मनात तेच विचार. मला अभिनेता म्हणून जगायचंय.
ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला. त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली, ‘पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा’. तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय. पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये. तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना.
“माजे बाबा ॲक्टल आहेत”, तेव्हा लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा. आज तिला बघितलं की लोक म्हणतात, “ही ईशा, ॲक्टर किरण मानेंची मुलगी.” ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय. पण मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा. तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस. तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो. खूप आनंदी रहा, हसतमुख रहा. तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू. बाबा.