कपिल शर्मा शो हा हिंदी सृष्टीतील लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी होत असतात. २०१६ सालच्या या शोमध्ये डॉ मशहूर गुलाटी, चंदू, लॉटरी, पुष्पा नानी अशी वेगवेगळे कॅरॅक्टर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसले. विशेष म्हणजे चंदूचा मुलगा खजूर हे कॅरॅक्टर प्रेक्षकांना खूपच भावले. द कपिल शर्माचा हा १२ वर्षाचा खजुर आता मोठा झाला आहे. हे पात्र साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे कार्तिकेय राज. बेस्ट ड्रामेबाज या शोच्या सहाव्या राउंडमध्ये १२ वर्षाचा कार्तिकेय राज कपिलच्या नजरेस पडला. कपिलने तिथेच कार्तिकेयच्या अंगी असलेल्या कलागुणांना हेरले होते.
कपिलने त्याला आपल्या शोमध्ये येण्याची ऑफर देऊ केली. एक ऑडिशन घेऊन कार्तिकेयची खजूरच्या कॅरॅक्टर साठी निवड करण्यात आली. कार्तिकेय हा पटना येथी सैदपूर या छोट्या गावात राहायचा. वडील गवंडीकाम तर आई टेलरिंगचा व्यवसाय करायची. दोन बहिणी एक भाऊ असे त्यांचे कुटुंब त्यामुळे घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती. शाळेत अभ्यासात मन रमत नसल्याने कार्तिकेय एका ऍक्टिंगच्या वर्कशॉपमध्ये सहभागी झाला इथुनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या शोसाठी तो ऑडिशन देत होता तेव्हा कपिलने त्याला पाहिले. कपिलच्या शोमधून कार्तिकेयला अमाप प्रसिद्धी मिळाली. आणि त्याला या शोमधून चांगले मानधन मिळू लागले. खजुरचा ऐश्वर्या राय सोबतचा एपिसोड खूपच गाजला होता.
या शोनंतर इस्कुल बॅग या चित्रपटात तो मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाला. एका शोमुळे हिट झालेला कार्तिकेय आता सेलिब्रिटी झाला आहे. आज त्याला हा शो सोडून बरेच वर्षे झाली आहेत, मात्र तरीही त्याला वेगवेगळ्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाते. कार्तिकेय सध्या आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत आहे. बालकलाकार म्हणून आजवर अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र त्यानंतर ही कलाकार मंडळी कला क्षेत्रापासून दुरावलेली पाहायला मिळतात. खजुरचा नटखटपणा कार्तिकेयने त्याच्या विनोदी अभिनयाने सुरेख वठवला होता. या सृष्टीतून तो कधी अलगद बाजूला पडला हे न उमगलेले एक कोडंच बनून राहिलं. अर्थात त्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नसली तरी कोणीतरी आपल्याला काम द्यावे या प्रतीक्षेत तो आहे.