मराठी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांच्या जोडीला आता हिंदी चित्रपटांचेही प्रमोशन केले जाते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नुकतेच सय्यमी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. घुमर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडळी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी अशा शोला हजेरी लावतात. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही अभिनेत्री नुसरत भरुचा हिने हजेरी लावली होती. अकेली या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती या शोमध्ये दाखल झाली होती. खरं तर हिंदी कलाकारांनी एक दोन शब्द मराठीतून म्हटले की लगेचच त्याचा उदो उदो केला जातो.
पण किती हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांचे प्रमोशन केले जाते? हा एक गंभीर प्रश्न आहे. हाच मुद्दा केदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट गेल्या ५० दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. इतके दिवस थिएटरमध्ये चालणारा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. त्याचा आनंद गगनात मावण्यासारखा नाही अशी प्रतिक्रिया केदार देत आहेत. या यशाच्या वाटचालीसाठी बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या टीमला चक्क हिंदी रिऍलिटी शो ने आमंत्रण दिल्याने केदार भारावून गेले आहेत. पण एकीकडे हे कौतुक होत असताना त्यांनी हिंदी आणि मराठी रिऍलिटी शोचे वास्तव समोर आणले आहे.
केदार यांनी दोन्ही क्षेत्रातील फरकाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. केदार शिंदे म्हणतात की, काल सोनी चॅनलच्या इंडियाज बेस्ट डान्सर ३ या कार्यक्रमात बाईपण भारी देवा टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी सैराट या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शो साठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो, मात्र हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. बाईपण भारी देवाचं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत.