२०२३ हे वर्ष दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी खूपच खास ठरलं. महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा असे दोन चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यापैकी बाईपण भारी देवा या चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचमुळे या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ९० कोटींहुन अधिक गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. केदार शिंदे यांच्या याच कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. डिरेक्टर ऑफ द इयर २०२३ म्हणून भारतीय दर्जेदार दिग्दर्शकाच्या यादीत केदार शिंदे यांचे नाव घेण्यात आले आहे.
फोर्ब्स मॅगझीन इंडियामध्ये केदार शिंदे यांचा दर्जेदार दिग्दर्शकाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी कला क्षेत्राच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे. या कामगिरीबद्दल आदेश बांदेकर यांनीही केदारचे विशेष अभिनंदन केले आहे. या दर्जेदार दिग्दर्शकांच्या यादीत दिग्दर्शक करण जोहर, विधु विनोद चोप्रा, सिद्धार्थ आनंद तसेच दक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्यासह मराठी चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचे नाव आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाईपण भारी देवा चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक साई पियुष यांचीही फोर्ब्सने दखल घेतलेली आहे. साई आणि पियुषने बाईपण भारी देवा या चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी लोकप्रियता मिळाली होती. गेली अनेक वर्षे ही जोडी मराठी नाटक, चित्रपटांना संगीत देत आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेत फोर्ब्सने शो स्टॉपर म्युजीशीयन ऑफ २०२३ या यादीत त्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे बाईपण भारी देवा या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून सन्मान वाढवला आहे. अशातच केदार शिंदे यांची कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल स्वतः आदेश बांदेकर यांनी केदार शिंदेचे कौतुक केले आहे. आता कार्पोरेट क्षेत्रातही केदार शिंदे यशस्वी भरारी घेतील असा विश्वास त्यांना आहे. हे कौतुक करताना आदेश बांदेकर म्हणतात की, रंगभूमी सही रे सही सुपरहिट, दूरचित्रवाणी श्रीयुत गंगाधर टिपरे सुपरहिट, चित्रपट बाईपण भारी देवा सुपरहिट या आणि अश्या कितीतरी सुपरहिट कलाकृती साकारणाऱ्या सर्वगुण संपन्न चतुरस्त्र केदारची Programming head कॉर्पोरेट जगतातील हि कारकिर्दसुद्धा सुपरहिट होवो हिच स्वामीच्या चरणी प्रार्थना.