केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट काल शुक्रवारी ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे सहा सुपर वुमनची कथा आहे. ज्यात महिलांना आपले आयुष्य स्वछंदी कसे जगता येईल यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे अर्थातच या चित्रपटाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल घडवून आणलेली पाहायला मिळाली. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, शरद पोंक्षे सारखी भली मोठी स्टारकास्ट आहे. या सर्व दिग्गज कलाकारांनी आपआपल्या भूमिका अगदी चोख बजावल्या आहेत.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली होती. यात महिला वर्गाचा मोठा समावेश होता. काल दुपारपर्यंत चित्रपटाचे जवळपास ३० हजाराहून अधिक तिकीट विक्री करण्यात होती. त्यामुळे चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार काल पहिल्याच दिवशी चित्रपटाने १ कोटी ५० लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमवलेला आहे. हा आकडा आज आणि उद्या विकेंड सुट्टी आसल्यामुळे आणखीन वाढणार आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहण्यासाठी काल आदेश बांदेकर सुद्धा उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर आदेश बांदेकरांनी दिग्दर्शक केदारला घट्ट मिठीच मारली होती.एका मित्राने न बोलता दिलेली ही प्रतिक्रिया पाहून केदार शिंदे भारावून गेले.
कित्येक वर्षे होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्ताने दार उघड बये दार उघड म्हणत वहिनींना मानाची पैठणी देणारा. त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा आदेश बांदेकर. याने काल बाईपण भारी देवा चित्रपट पाहून मला कडकडून मिठी मारली. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. असे म्हणत केदारने आदेश बांदेकर यांच्या प्रति एक छानशी प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमा गृहातील केदार यांचा एक फोटो खूपच बोलका आहे. हा कुठल्या सभेतला फोटो नाही, कालच्या सिनेमाच्या खेळाचा आहे. हे प्रेम पहिल्याच दिवशी? अजून तर खुप पल्ला गाठायचा आहे. तुमचे आशिर्वाद सदैव राहोत. बाकी पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेतच.