झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत राघव एका मुलीचा बाप आहे आणि आपल्या मुलीसाठी तो दुसरे लग्न करायला तयार झालेला असतो. आनंदीसोबत तो लग्न करतो मात्र पहिल्या पत्नीला रमाला तो अजूनही विसरलेला नसतो. या मनस्थितीत असताना राघव आनंदीला आपलेसे करणार का, अशी ही कहाणी नवा गडी नवं राज्य मालिकेतून दाखवण्यात आली आहे. कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, अनिता दाते, वर्षा दांदळे, साइशा भोईर आणि कीर्ती पेंढारकर यांनी या मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कश्यप परुळेकर बऱ्याच वर्षानंतर मालिकेतून प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तप्तपदी, बुगडी माझी सांडली गं, पानिपत या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत दिसला. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत दिसला. होम मिनिस्टरच्या आजच्या विशेष भागात कश्यप, पत्नी माधवी आणि त्याच्या कुटुंबियाने हजेरी लावलेली पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात आदेश बांदेकरांनी कश्यपच्या पत्नीला म्हणजेच माधवीला बोलतं केलेलं पाहायला मिळालं. कश्यप आणि त्याची पत्नी एकाच शाळेत शिकायला होते. माधवीला पाहिल्यापासून कश्यप तिच्या प्रेमात पडला होता. यासाठी त्याने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र त्यावेळी मैत्री करण्यास तिने नकार दिला. दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर एका फॅमिली फ्रेंडच्या मदतीने त्याने पुन्हा माधवीकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडला.

यावेळी कॉलेजमध्ये असल्याने कश्यपच्या मैत्रीचा प्रस्ताव तिने स्वीकारला. साधारण एक वर्षाच्या मैत्रीमध्ये कश्यपने माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे माधवीला स्पष्ट सांगितले होते. मात्र घरचे काय म्हणतील? या विचाराने कश्यपच्या पत्नीने होकार कळविण्यास वेळ घेतला. २०१५ साली घरच्यांच्या संमतीने या दोघांनी विवाह केला. इरा ही त्यांची गोड मुलगी. बाप लेकीचं नातं रिअल लाईफमध्ये जेवढं सुंदर आहे तेवढंच मालिकेत काम करत असताना साइशा सोबत कश्यपची छान गट्टी जमलेली आहे. मालिकेच्या सेटवर कलाकारांचे बॉंडिंग जुळून आले की मालिकेला अधिक रंग चढतो असे म्हटले जाते. त्यामुळे ही सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात हळूहळू जागा निर्माण करत आहेत. यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.