दृश्यम चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा पार्ट टू बनवण्यात आला. या चित्रपटात गायतोंडे आणि साळगावकरचे पात्र खूपच चर्चेत आले. गायतोंडेच्या विरोधी भूमिकेमुळे लोक कमलेश सावंतला शिव्या द्यायचे. खरं तर हीच आपल्या अभिनयाची पावती असते जी लोकांकडून मिळत असते. या भूमिकेमुळे कमलेश सावंत चर्चेत आला. मात्र ही भूमिका मिळण्यामागे चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा मोठा वाटा आहे, असे कमलेश सावंत अधोरेखित करतात. एका मुलाखतीत कमलेश सावंत यांनी त्यांना ही भूमिका कशी मिळाली याचा किस्सा सांगितला आहे.
लक्ष्य, अशाच एका बेटावर, कौल मनाचा, फास, मोर्चा, दगडी चाळ अशा चित्रपटात त्यांनी दर्जेदार भूमिका निभावल्या. कमलेश सावंत हे उत्कृष्ट अभिनेते आहेत हे निशिकांत कामत यांना चांगलेच ठाऊक होते. त्यांच्याकडे पाहूनच निशिकांत कामत यांनी कमलेश सावंत यांना डोंबिवली फास्ट, लई भारी चित्रपटासाठी विचारले होते. मात्र वेळ मिळत नसल्याने कमलेश सावंत यांनी त्यांना नकार कळवला होता. परंतु जेव्हा दृश्यम चित्रपट बनवायचे ठरले त्यावेळी गायतोंडेची भूमिका कमलेशनेच करायची असे त्यांनी पक्के केले होते. या भूमिकेसाठी कमलेश यांनी ऑडिशन देखील दिली आणि निवड झाली. मात्र चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमने कमलेश सावंत यांचे अगोदरचं कुठलेही काम पाहिलेले नव्हते.
त्यामुळे सेटवर आल्यावर खुर्ची न देणे, त्यांची चौकशी देखील न करणे असे अपमानास्पद प्रकार त्यांना अनुभवायला मिळाले. परंतु कमलेश सावंत यांना अशा वागणुकीचा काहीच फरक पडला नाही. कारण बाहेरच्या लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. मला माझ्या घरच्यांकडून जेवढा मान सन्मान मिळतो तेवढा माझ्यासाठी पुरेसा असतो. असे कमलेश सावंत यांनी गमती गमतीमध्ये म्हटले. पण त्यानंतर त्या प्रोडक्शन टीमने माझं रामोजी फिल्म सिटीमधला शूट झालेला एक सिन बघितला त्यानंतर त्यांनी बसायला खुर्ची दिली. माफी मागत म्हणाले की, आम्ही तुमचं याअगोदरचं कुठलंच काम पाहिलेलं नव्हतं पण तुम्ही हिरोच्या विरुद्ध गायतोंडेची एवढी मोठी भूमिका साकारणार.
गायतोंडे हिरोला कानाखाली वाजवणार असल्याने, हा कोण आहे? निशिकांत कामतने कोणाला कास्ट केलंय? यानी कोणतं असं मोठं काम केलंय? असा प्रश्न आम्हाला पडला होता. पण तुमचं काम आम्ही पाहिलं आणि तुमची योग्य भूमिकेसाठी निवड झाली हे आम्हाला कळून चुकलं. प्रोडक्शन टीमच्या या माफिनाम्या नंतर कमलेश सावंत शांतपणे प्रतिक्रिया देतात की, तुम्ही मला मानसन्मान द्या अथवा देऊ नका मी माझं दिलेलं काम करणार. फक्त माझं मानधन तेवढं वेळेवर देत जा, बाकी मला तुमच्या कुठल्याच गोष्टीशी देणंघेणं नाही. मी केवळ माझं घर चालवण्यासाठी काम करतो, असे म्हणून ते तिथून निघून गेले.