मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या नायिका पुढे जाऊन हिंदी चित्रपटात झळकतात ही परंपरा खूप जुनी आहे. अशा मराठी नायिकांनी चंदेरी दुनियेत एक वेगळा ठसा उमटवलेला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काळात डोकावले तर सुलोचना लाटकर, शोभना समर्थ, ललिता पवार, शशिकला, कमलाबाई गोखले या मराठमोळ्या नायिकांनी मराठी सोबतच हिंदी सृष्टीतही गाजवली. एक घरंदाज आणि सोज्वळ नायिका म्हणून यांनी वेगळी ओळख जपली आहे. यातच ६० ते ७० चे दशक गाजवणाऱ्या आणि विस्मृतीत गेलेल्या कामिनी कदम या नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. कामिनी कदम यांचा जन्म मुंबईतलाच. माणिक कदम या नावानेही त्या ओळखल्या जातात.
चित्रपटातील स्मिता हे नावही त्यांनी आत्मसात केले होते. १९५५ साली ये रे माझ्या मागल्या या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. कामिनी कदम या व्ही शांताराम यांचे भाऊ व्ही अवधूत यांची मेहुणी असल्याचे सांगितले जाते. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या कामिनी यांनी मराठी चित्रपटात आपला चांगला जम बसवला होता. वाट चुकलेले नवरे, देवाघरचं लेणं, पहिलं प्रेम, दोन घडीचा डाव, आंधळा मागतो एक डोळा, संथ वाहते कृष्णा माई, सुधारलेल्या बायका या चित्रपटातून त्यांनी सोज्वळ नायिका तसेच बिनधास्त भूमिका देखील साकारल्या. राजा गोसावी यांच्यासोबत जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. सुधारलेल्या बायका या चित्रपटात त्यांनी आधुनिक स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती.
राजा गोसावी आणि कामिनी कदम यांनी एकत्रितपणे काही चित्रपटातून काम केले आहे. १९५८ सालच्या तलाक या चित्रपटातून त्यांनी हिंदी सृष्टीत पाऊल टाकलं. राजेंद्र कुमार यांच्या नायिकेची भूमिका त्यांनी साकारली होती. संतान, सपने सुहाने, माँ बाप, मियाँ बीबी राजी, स्कुल मास्टर अशा हिंदी चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याकाळी अनेक तरुणांना त्यांनी आपल्या सौंदर्याने भुरळ घातली होती. ७० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले होते. मात्र कालांतराने त्या चित्रपट सृष्टीतून बाजूला झाल्या. २९ जून २००० रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज कामिनी कदम प्रेक्षकांच्या विस्मृतीत गेल्या असल्या तरी त्यांच्या सौंदर्याने हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही भुरळ घातली होती हे विसरता कामा नये.
kAMINI KADAM also acted in Jine Ki Raah 1969.