जीव झाला येडा पिसा या मालिकेने निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेला. देवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची. वडील नाट्य क्षेत्राशी निगडित असल्याने तिला लहानपणापासूनच अभिनयाची गोडी होती. शर्वरीचा शालेय बालनाटकात हिरीरीने सहभाग असायचा. कॉलेजमधून शर्वरीने दुर्गाबेन, घोडा, अनुवाद, प्रत्यय यासारख्या प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांमधून काम केलं होतं.
बॅचलर ऑफ सायन्स पदवीधर शर्वरीला चित्रकलेची विशेष आवड होती, कला निकेतनमधून तिने फाईन आर्टसचे शिक्षण पूर्ण केले. श्रावण क्वीन कोल्हापूर मध्ये तीने बेस्ट परफॉर्मरचे पारितोषिक देखील पटकावले होते. टेलिव्हिजन जगतात पदार्पण केल्यानंतर लोकप्रिय मालिका जीव झाला वेडा पिसा मधून सोनीच्या भूमिकेने शर्वरीला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या सन मराठी वाहिनीवरील जाऊ नको दूर.. बाबा या मालिकेमध्ये ती अर्पिताच्या बहिणीची भूमिका निभावत आहे. शर्वरी जोग ही नाट्य तसेच मालिका अभिनेता गौरव मालणकर याच्या प्रेमात पडली आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्यासोबत असलेल्या प्रेमाची कबुली तीने दिली. झी युवा वरील फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत त्याने भूमिका साकारली होती. गौरव मालणकर हा इंजिनिअरिंग शिकत असताना युथ फेस्टिव्हलमध्ये एकांकिका करायचा, परंतु अभिनय क्षेत्रात येण्याला त्याच्या घरच्यांकडून विरोध होता. मात्र पुढेही थेटर करण्याचा त्याचा निर्णय पक्का होता. कलेवर लक्ष केंद्रित करून त्याने पथनाट्य, ८ प्रायोगिक आणि २ व्यावसायिक नाटक तसेच २६ एकांकिका करून ४ वर्ष आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा गाजविल्या. विभवांतर या एकांकिके मुळे त्याला टीव्ही जगतात येण्याची संधी मिळाली.
फुलपाखरू ही त्याने अभिनित केलेली पहिली टेलिव्हिजन मालिका ठरली, या मालिकेत त्याने गौरवची भूमिका साकारली होती. त्यानंतर तू माझा सांगाती, दहा बाय दहा, साईबाबा श्रद्धा आणि सबुरी, तुझ्या वाचून जमेना, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा मालिका तसेच चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्याला जिवा महाला ही व्यक्तिरेखा करण्याची संधी मिळाली. गौरव अभिनेत्री शर्वरी जोग हिच्या प्रेमात आहे आणि तशी त्या दोघांनीही प्रेमाची कबुली दिली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देत “दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी तरी, आली माझ्या घरी ही दिवाळी. हे म्हणायची संधी मिळेल का? आणि पुढच्या दिवाळीला एकाच फोटोत.. मी कुर्त्यामध्ये आणि तु साडीमध्ये असण्याची आशा करायला हरकत नाही, कारण तलाव पाळीची मजा रंकाळ्यात नाही..” असं तो म्हणतो. शर्वरीच्या घाऱ्या डोळ्यांनी त्याला पुरते घायाळ केले असल्याचेही तो सांगतो. प्रेक्षकांच्या आवडीचे हे दोन्हीही कलाकार लवकरच विवाहबंधनात पाहायला मिळेल अशी आशा वाटते.