जत्रा या चित्रपटाच्या अनेक आठवणी रसिक प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. कोंबडी पळाली, या गाण्यामुळे क्रांती रेडकरला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ये गो ये ये मैना, या गाण्यात अंकुश चौधरी, दीपाली सय्यद यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. भरत जाधव, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे, कुशल बद्रीके, रमेश वाणी. गणेश खेडेकर, विजू खोटे, उपेंद्र लिमये, महेश कोकाटे, सुनिल तावडे, जयराज नायर, वंदना वाकनीस अशी बरीचशी कलाकार मंडळी या चित्रपटाला लाभली हे विशेष. २००५ साली हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. आज चित्रपटाला जवळपास १७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळतो आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत महाराष्ट्र शाहीर चित्रपट टीम सातारच्या वाई तालुक्यातील पसरणी गावात गेली होती. जत्रा या चित्रपटाचे शूटिंग देखील याच गावात करण्यात आले होते. गेल्या १७ वर्षात पसरणी गावाचा मोठा कायापालट झालेला केदारच्या लक्षात आला. चित्रपटातील त्यावेळचे गाव आणि आताचे गाव पाहून त्याला त्यात कमालीचा बदल जाणवला. गावातल्या पूर्वीच्या जागा आणि आताच्या जागेचा बदल केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. चित्रपटातील काही सीन हेरून त्या त्या ठिकाणी आता कसे बदल झालेले आहेत हे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. खरं तर शाहीर साबळे हे मूळचे वाई पसरणीचे.
शाहीर साबळे यांच्या जीवनपटात कलेचा वारसा लाभलेला हे गाव तेवढेच महत्वाचे आहे. केदार शिंदे या गावाच्या आठवणी सांगताना म्हणतात की, २८ ऑक्टोबर २००५ साली जत्रा रिलीज झाला होता. ह्या २८ ला १७ वर्ष झाली त्या दिवसाला; एक तो दिवस आहे आणि एक आजचा. ह्या वर्षांमध्ये जत्राने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला जत्रा आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सध्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे जत्रा शूट झाला होता. आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली जत्रा तशीच आहे!