झी मराठीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून आदेश बांदेकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभराचे ते ‘आदेश भाऊजी’ बनून गेले. आज मराठी सृष्टीतलं लाडकं कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी” आज जाणून घेऊयात…
सुचित्रा या बालमोहनच्या विद्यार्थिनी त्यामुळे मुलांशी गरजेपेक्षा जास्त बोलणं ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. आठवी नववी नंतर तर मुलांशी बोलणं हे तर टिपिकल समजलं जायचं. अशा वेळी आदेश बांदेकर सुचित्राला भेटायला शाळेबाहेर यायचे. हे पाहून सुचित्रा जाम घाबरून जायच्या आणि माझं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही असे सांगून त्यांना तिथून जायला सांगायच्या. हा नकार वारंवार मिळत असल्याने एक दिवस आदेश बांदेकर यांनी सुचित्राच्या घरी जाण्याचे ठरवले. सुचित्राच्या आई बाहेर गेल्यात हे पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि लग्नाची मागणी घातली त्यावेळी सुचित्रा यांनी आपला होकार कळवळा होता.
लव्हस्टोरीला खरी सुरुवात इथून पुढे झाली. शालेय शिक्षणानंतर सुचित्रा यांनी रुपारेल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले तिथेच आदेश बांदेकर रुपारेलमध्ये असल्याने या दोघांच्या पुन्हा एकदा भेटी गाठी वाढू लागल्या होत्या. सुचित्राच्या घरच्यांना आदेश बांदेकर मुळीच पसंत नव्हते ते त्यावेळी असल्याने त्यांच्या दोघांच्या लग्नाला घरातून प्रचंड विरोध होता. थोड्याच दिवसात त्यांनी एक साधीशी नोकरी मिळाली, आणि मग सुचित्राने आदेशसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुचित्रा फर्स्ट इयरला शिकत होत्या आणि आदेश बांदेकर त्यावेळी केवळ ३६५ रुपयांच्या पगारावर नोकरी करत होते. महिन्याला तीनशे पासष्ठ रुपये त्यावेळी तुटपुंजे वाटत असले तरी या एवढ्याश्या पगारात मोठ्या हिमतीने या दोघांनी आपला संसार थाटला होता. या प्रवासात सुचित्राची मिळालेली साथ मोठी मोलाची होती असे आदेश बांदेकर सुचित्राबद्दल बोलताना आवर्जून सांगतात.
सोन्याचा दागिना असावा अशी अपेक्षा सुचित्रा यांनी कधी केलीच नव्हती अगदी २००६ साली सुचित्राने पहिल्यांदा सोन्याचे मंगळसूत्र घातले होते अशी आठवण त्यांनी एका मुलाखतीत करून दिली होती. सुरुवातीच्या काळात या दोन्ही कलाकारांनी आपला जम बसावा म्हणून खूप स्ट्रगल केला. दरम्यान सुचित्रा हिंदी मालिका सृष्टीत स्थिरस्थावर झाल्या होत्या. तर आदेश बांदेकर हे देखील ताक धिना धीन सारख्या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले होते. काही नाटक आणि मालिका त्यांनी साकारल्या मात्र यातून फारसा जम न बसल्याने ते सूत्रसंचालन कडे वळले. त्यामुळे ते नेहमी सूत्रसंचालनाच्या भूमिकेतच जास्त पाहायला मिळाले आणि याच भूमिकेतून ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले.
आज सुचित्रा बांदेकर अभिनयापासून थोड्याशा दुरावलेल्या असल्या तरी निर्मिती क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलेले पाहायला मिळते तसेच आदेश राजकारणात खुप सक्रिय आहेत. सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा देखील आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. नवे लक्ष्य या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. पीएसआय जय दीक्षित ही भूमिका साकारून तो या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.