हिंदी इंडियन आयडॉलच्या भरघोस यशानंतर हा शो मराठीतून व्हावा अशी इच्छा होती. जेणेकरून मराठी कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी एक मोठा मंच उपलब्ध होईल. या पहिल्याच सिजनमध्ये अजय अतुल यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने स्पर्धकांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून २४ दर्जेदार गायकांनी या शोमध्ये सहभाग नोंदविला होता. यात कैवल्य केजकर, भाग्यश्री टिकले, अविनाश जाधव, शुभम खंडाळकर, अमोल सकट, ऋषिकेश शेलार, श्वेता दांडेकर, चैतन्य देवढे.
तसेच आम्रपाली पगारे, जगदीश चव्हाण, अश्विनी मिठे, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे आणि सुरभी कुलकर्णी या टॉप १४ स्पर्धकांनी पहिल्या सिजनमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. त्यानंतर मधल्या काळात या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली होती. देवश्री मनोहर हिची वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झालेला सुरांचा हा प्रवास आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ह्या आठवड्यात इंडियन आयडॉलचे अंतिम पाच स्पर्धक निश्चित करण्यात आले आहेत. सोमवार ते बुधवार म्हणजेच १८ ते २० एप्रिल रोजी मराठी इंडियन आयडॉलचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. यात प्रतीक सोळसे, श्वेता दांडेकर, भाग्यश्री टिकले, सागर म्हात्रे आणि जगदीश चव्हाण या टॉप ५ स्पर्धकांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे. ह्या आठवड्यात संगीत क्षेत्रातील दिग्गज प्यारेलाल यांनी हजेरी लावून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले होते. सोबतच त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला होता. बेला शेंडे, अनुराधा पौडवाल, अशोक सराफ, सुदेश भोसले, पल्लवी जोशी, आरती अंकलीलकर टिकेकर. श्रीवल्ली फेम सिड श्रीराम, अनुपम खेर, नागराज मंजुळे, उदित नारायण, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे यांनीही इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावून आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. महाअंतिम सोहळ्यासाठी कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार हे लवकरच जाहिर केले जाणार आहे.
अंतिम फेरीच्या टॉपच्या पाच स्पर्धकांनी आतापर्यंत विविध गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मुख्य म्हणजे प्रतीक सोळसे हा स्पर्धक एका वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे या स्पर्धेत टिकून आहे. तर भाग्यश्री टिकलेच्या आवाजाची जादू अजय अतुल यांना देखील भावली आहे. सुरुवातीपासूनच सागर म्हात्रे हा स्पर्धक या शोमध्ये अधिक तगडा स्पर्धक वाटला आहे. त्यामुळे या पहिल्या सिजनमध्ये स्पर्धकांमध्ये चूरशीची लढत रंगणार आहे हे प्रेक्षक देखील जाणून आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे २० एप्रिलच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या पाचही स्पर्धकांचे अभिनंदन आणि फायनलसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.