तीन अडकून सीताराम हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्त वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे आणि ऋषीकेश जोशी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ऋषीकेश जोशी हे नेहमी स्पष्टवक्ते आहेत. आपल्याला कुठलीही गोष्ट खटकली की ते लगेचच ती बोलून दाखवतात. त्यांचा हजरजबाबीपणा तोंडघशी पडणारा ठरतो. वैभव तत्ववादी याने त्यांच्यासोबतचा एक किस्सा इथे शेअर केला. हे दोघेही एका प्रोजेक्टसाठी परदेशात गेले होते. तिथे डीम लाईटमध्ये डिनर ठेवलं होतं. त्यात एक नटी गॉगल घालून फिरत होती.
वैभव सांगतो की, ऋषीकेश आणि मी आम्ही दोघेही जेवायला बसलो. ऋषीकेश जोशी त्यावेळी ओरडले आणि म्हणाले, अरे तिला सांग चिकनच्या जागी तिने कलिंगड उचललंय. हे ऐकून मला काय करावं हेच सुचत नव्हतं. पण त्या नटीला वाटत होतं की मी तिच्याकडे बघून हसतोय. पुढे वैभवने प्रियांका चोप्राचा एक किस्सा सांगितला. प्रियांका चोप्रा ऋषीकेश जोशी यांच्या पाठांतराचं खूप कौतुक करत होती. त्यावेळी ऋषीकेश जोशी म्हणाले होते की, हिला पाठांतराचंच अप्रूप आहे म्हणे, अभिनय तर खूप पुढची गोष्ट आहे. तेव्हा ऋषीकेश जोशी यावर सविस्तरपणे सांगतात की, प्रियांका चोप्रा जेव्हा माझं कौतुक करत होती तेव्हा ते मला अपमानास्पदच वाटत होतं. एका सिनेमासाठी एक सिन ऐनवेळी बदलला.
विशाल भारद्वाज यांना त्या सीनमध्ये काहीतरी चुकीचं वाटलं म्हणून त्यांनी पानभर संवाद लिहून आणले होते. मी ते पान हातात घेतलं आणि लगेचच टेक घ्यायला सांगितलं. तर प्रियांका चोप्रा माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागली. एवढ्या लवकर पाठ झालं असा प्रश्न विचारताच ऋषीकेश जोशी हो असं बोलले. तिला ते खूप भारी वाटत होतं की एवढ्या लवकर पाठ झालं सुद्धा. यावर ऋषीकेश जोशी म्हणतात की, अरे ह्यांना पाठांतराचच अप्रूप आहे पण मला असं झालं होतं की काम कधी करायचं मग? हे ऐकून उपस्थितांना हसून लोटपोट व्हायला झालं होतं. बॉलिवूडचे कलाकार मराठी कलाकारांना दबकून असतात याचे दाखले देणारे अनेक उदाहरणं तुम्ही ऐकले असतील. ऋषीकेश जोशी यांचा किस्सा त्यातलाच एक म्हणावा लागेल.
त्याचमुळे हिंदी कलाकार मराठी कलाकारांचा नाद करत नाहीत. हे कलाकार पाठांतरावरच आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत असतात. स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील हाच अनुभव घेतला होता. सलमान खानसोबत मैने प्यार किया हा चित्रपट करत असताना सलमान माझ्याशी बोलत नव्हता असे लक्ष्मीकांत बेर्डे एका मुलाखतीत सांगतात. कारण मराठी कलाकारांचे पाठांतर अगदी चोख असते आणि त्याचमुळे हिंदी कलाकार आपला त्यांच्यापुढे निभाव लागणार नाही या विचाराने गप्प बसून असतात. त्याचमुळे सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डे यांना दबकून होता असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते.