होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील तितकाच प्रचंड प्रमाणात आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आदेश बांदेकर हे नाव चांगले परिचयाचे बनले आहे. या कार्यक्रमातून वहिनींना बोलतं करण्याची त्यांची स्टाईल आणि त्यांचा हसतमुख दिलखुलासपणा प्रेक्षकांना भावला आहे. त्यांची अशीच एक चाहती वयाची ९९वी पार करताना दिसली. त्यावेळी आदेश बांदेकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. सध्या महामिनिस्टर कार्यक्रमामुळे आदेश भाऊजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत मात्र एका आज्जीची त्यांनी सांगलीला जाऊन भेट घेतली आहे.
नलिनी जोशी असे या आज्जीचे नाव आहे. ज्यांनी १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. नलिनी जोशी या आजही उत्तम गाणं गातात. भक्ती गीत असो वा भावगीत या वयातही आज्जींनी आपली गाण्याची आवड जोपासलेली पाहायला मिळते आहे. त्यांचा असाच एक गाणं गातानाचा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी पाहिला होता. त्यावेळी मी आज्जीची भेट घेईन असे आश्वासन त्यांनी दिले होते. काही दिवसांपूर्वीच आदेश बांदेकर यांनी आपला दिलेला शब्द पाळून आज्जीच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांची भेट घेतली. प्रत्यक्षात आपल्या समोर आदेश बांदेकरांना पाहून आज्जींना प्रचंड आनंद झाला. यावेळी भाऊजींनी आजीसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
आज्जीच्या रुपात ते आपल्या आईलाच पाहत असल्याने आदेश भाऊजींचे डोळे पाणावले, हा भावनिक क्षण उपस्थितांनी अनुभवलेला पाहायला मिळाला. आदेश भाऊजींसाठी जोशी आज्जीनी गाणं देखील गाऊन दाखवलं. रत्नागिरीच्या दौऱ्यानंतर आज करविरनिवासीनी श्री महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे दर्शन घेऊन आदेश भाऊजींनी कोल्हापूर दौरा सुरू केला आहे. महामिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून ते कोल्हापुरातील तमाम वहिनींना आता बोलतं करणार आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिलेला शब्द पाळून नलिनी आज्जीची सांगलीला जाऊन भेट घेतली. हा आनंदाचा क्षण त्यांनी शेअर केला आहे आणि या चिरतरुण आज्जीचा उत्साह पाहून त्यांनी या आज्जींचं कौतुकही केलं आहे.