महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम पार पडला. प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे कारण सांगितले आहे. मी मूळचा कोकणातला, चिपळूणचा. कोकणाला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे. या गावातून मी प्रवास करत आज मुंबईत स्थिरस्थावर झालो आहे. गावी असताना मी लोककला सादर केली, नाटकातून काम केले आहे. माझ्या प्रत्येक अभिनयातून मी कोकणची कला सादर करतो. पण वीस पंचिविस वर्षे काम केल्यानंतर, कामातील सातत्य जपल्यानंतर मला काही गोष्टींची जाणीव झाली आहे.
हे कष्ट घेत असताना मी आता कोकणातील कलाकारांना कुठेतरी मार्गदर्शन करू शकतो. यासाठी मी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि माझा ह्यात काम करण्याचा मानस आहे. दादा आणि सुप्रिया ताई नेहमीच कलाकारांच्या बाजूने बोलत असतात. ते नेहमी कलावंतांना सहकार्य करतात. मागील काळात सुद्धा निर्माते, कलाकार यांच्या पाठीमागे ते सातत्याने उभे राहिले. मार्गदर्शन करत राहिले, वेळोवेळी मदत सुद्धा केलेली आहे. मी आता कलाकार म्हणून अध्यक्षपदी माझी नेमणूक करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य कलाकारांसाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे. केवळ कोकणापुरतेच मर्यादित नसून हा प्रयत्न मी संपूर्ण राज्यभर करणार आहे. असे प्रभाकर मोरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, पांघरून, टकाटक, कट्टी बट्टी, शेजारी शेजारी या आणि अशा कितीतरी शो, मालिका आणि चित्रपटातून प्रभाकर मोरे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यांनी साकारलेलं स्त्री पात्र असो वा बाल्या डान्स अथवा मालवणी अंदाजात घेतलेली फिरकी या सर्वांमुळे प्रभाकर मोरे हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे. या प्रसिद्धीचा फायदा आता त्यांना राजकारणात देखील होत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात मदत मिळवून देण्यासाठी कलाकारांची रखडलेली कामं करण्यासाठी तसेच येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणाचा मार्ग निवडला आहे. हास्यजत्रा शोमुळे प्रभाकर मोरे यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा बनवली आहे. त्यांच्या राजकारणातील प्रवेशावरून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.