इतिहासातील अशी एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना, म्हणजे जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच एक वळण लावले. मुघल सम्राज्याच्या राजधानीतून त्याच्या नजरकैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले आणि असे घडले की पुढे आयुष्यभर औरंगजेबला त्या एका घटनेबद्दल पश्चात्ताप होत राहिला. मुघल पातशहाच्या पन्नासाव्या वाढदिवशी सहा सात हजार मनसबदार, देश परदेशातील राजे रजवाडे यांच्या देखत सह्याद्रीच्या शिवसिंहाने मराठी स्वाभिमानाची गगनभरारी गरूडझेप जगाला दाखवून दिली! त्या स्फूर्तिदायक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रसंगाची चित्तथरारक गोष्ट साकार होत आहे.

इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हाच प्रेरणादायी अध्याय आता ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून ५ ऑक्टोबर २०२२. म्हणजेच विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. डॉ अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक केंढे यांनी केलं आहे. तर प्रफुल्ल तावरे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. पटकथा डॉ अमोल कोल्हे यांनी लिहिली असून, युवराज पाटील यांच्या साथीनं त्यांनी संवाद लेखनही केलं आहे.

यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य असे अनुभवी कलाकार अमोल कोल्हेंसोबत असणार आहेत. तसेच अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. छत्रपती शंभुराजेंच्या भूमिकेत हरक अमोल भारतीय हा बालकलाकार झळकणार आहे. हरक भारतीय हा ११ वर्षांचा असून, तो शाळेतील संस्कृतीक कार्यक्रमातून नेहमी सहभागी होत असतो. आभिनया सोबत हरकला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. वेगवेगळ्या नामवंत ब्रॅण्डसाठी त्याने रॅम्पवॉक केलं आहे. स्टार ग्लॅझ या ऍक्टिंग वर्कशॉपमधून अभिनयाचे धडे गिरवत असताना हरकने मराठी मालिकांसाठी ऑडिशन दिलं.
स्वराज्य जननी जिजामाता या सोनी मराठी वरील मालिकेतून त्याला बाल शंभूराजेंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेसाठी लागणारा सेटवरचा त्याचा वावर प्रेक्षकांना भारावून टाकणारा ठरला. आणि म्हणूनच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातून हरकला पुन्हा एकदा याच भूमिकेसाठी निवडलं. पहिलीच मराठी मालिका आणि पहिलाच भव्य मराठी चित्रपट यासाठी शंभू राजेंच्या भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल हरक खूपच उत्सुक होता. चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपतींचा इतिहास सांगणारा हा भव्य चित्रपट प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवताना दिसणार आहे. त्यासाठी चित्रपटाच्या सर्वच टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.