झी स्टुडिओज प्रस्तुत हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. मराठी भाषेसह, हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे त्यामुळे देशभर या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे तर शरद केळकर आणि अमृता खानविलकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे आणि सोनाबाईंची भूमिका निभावली आहे. ३० सप्टेंबर रोजी मुलुंड येथील कालिदास रंगमंदिरात या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमृता खानविलकर प्रथमच या चित्रपटातून ऐतिहासिक पात्र साकारणार आहे, त्यामुळे ती आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक होती. तर शरद केळकर बाजीप्रभूंची दमदार भूमिका साकारणार असल्याने ही एक मोठी जबादारी असल्याचे तो मानतो. अभिनेता सुबोध भावे याने या चित्रपटासाठी मानधन घेतले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणं हे एक आव्हान नसलं तरी ती एक जबादारी होती असे तो मानतो. आपण या चित्रपटासाठी मानधन का घेतले नाही. याबाबत बोलताना तो म्हणतो की, आपण मंदिरात जातो आपली खूप ईच्छा असते त्यांचं दर्शन घ्यायची. परंतु परमेश्वराची ईच्छा असल्याशिवाय आपलं दर्शन होत नाही. तसं प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असल्याशिवाय ती भूमिका माझ्यापर्यंत येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले. अनेक नामवंत निर्मात्यांनी त्याची निर्मिती केली, त्याच दिग्दर्शन केलं. चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे ते अगदी भूषण प्रधान पर्यंत कितीतरी जणांनी छत्रपती शिवरायांची भूमिका केली. प्रत्येकानेच ही भूमिका उत्तम प्रकारे सादर केली. पुढे अभिजित खांडकेकर याने सुबोधने मानधन घेतले नसल्याचे सांगितले तेव्हा सुबोध म्हणाला की, मला ही गोष्ट जाहीर करायची नव्हती, पण लहानपणी प्रत्येकानेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका जगल्या आहेत. आपण कोणीही त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नसलं तरी आपल्या प्रत्येकाच्या डीएनए मध्ये प्रभू श्रीरामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आहेच आहेत.
स्वराज्याची पाहत दाखवण्याचे काम छत्रपतींनी केलं आहे आणि जेव्हा अशी भूमिका तुमच्याकडे येते तेव्हा हेच तुमचं मानधन आहे. अजून कुठल्या मानधनाची मी अपेक्षा नाही करत. जेव्हा या भूमिकेसाठी मानधन दिलं तेव्हा हे मानधन छत्रपती शिवराय म्हणजेच स्वराज्याचे पैसे आहेत. हे पैसे मी बाजूला ठेवून त्यातून जे व्याज मिळेल ते उपेक्षित घटकांसाठी वापरले जातील. असे सुबोध भावे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सुबोधच्या निर्णयाचं स्वागत केलं.