सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड मध्ये येईल याचा आजवर कोणालाच अंदाज बांधता आलेला नाही. मात्र जिथे एकेकाळी खानदेशातील अहिराणी भाषेला लोकांनी नावं ठेवली आज त्याच भाषेतील गाण्याचा बोलबाला देशभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हाई झुमका वाली पोर, हे गाणं आता सोशल मीडियावर देशात ७ व्या क्रमांकवर जाऊन पोहोचलं आहे. देशभरात गाण्याला जोरदार पसंती मिळत असून केवळ तरुणाईलाच नव्हे तर मोठमोठ्या सेलिब्रिटींना सुद्धा या गाण्यानं वेड लावलं आहे. हे गाणं खानदेशातील अहिराणी भाषेत म्हटलेलं आहे.
गाण्याचा अर्थ इतर भाषिक लोकांना समजणे थोडेसे कठीण असले तरी गाण्याची चाल तरुणाईला आपोआप थिरकायला भाग पाडत आहे. मोठमोठाले सेलिब्रिटी सुद्धा ह्या गाण्यावर रील बनवत आहेत, त्यामुळे हे गाणं सध्या युट्युबर ७ क्रमांकावर जाऊन पोहोचलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याला युट्युबवर आतापर्यंत ५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. हे गाणं फक्त सोशल मीडियावरच नाही तर शाळा कोलेजच्या सांस्कृतिक सोहळ्यात, लग्न सराईत, वरातीत, मोठमोठ्या संगीत सोहळ्यात सुद्धा वाजवलं जात आहे. त्यामुळे या गाण्याचा डंका महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात सुद्धा वाजत आहे. विनोद कुमावत आणि राणी कुमावत या कलाकारांवर हे गाणं चित्रित झालं आहे.
भैय्यासाहेब मोरे आणि अंजना बारलेकर यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्याचा हिरो विनोद कुमावत याला हे गाणं कसं सुचलं याबाबत तो म्हणतो की, चालता चालता त्याला रस्त्यात एक झुमका सापडला, त्यावरून झुमका वाली पोर ही ओळ त्याला सुचली. त्यावर लगेचच त्याने त्याची कल्पना आपल्या मित्राला सांगितली. विनोदच्या घराच्या जवळच एका शेतकऱ्याच्या बैलाची नावं राघ्या वाघ्या होती. यावरून त्याने ही नावं आपल्या गाण्यात घेतली. भय्या मोरे आणि विनोदने या गाण्याचे बोल लिहून काढले. गाण्याला सूर लावला आणि ते स्वतःवर चित्रीतही केलं. या गाण्याचं शूटिंग ओझर येथे करण्यात आलं होतं. विनोद हा मूळचा पाचोरा या गावचा. भातखंडे गावात इयत्ता चौथीपर्यंत शिकला, त्यानंतर तो दहा वर्षे कळवंदला राहिला.
पुढे तो नाशिकला बॉश कंपनीत काम करत पार्टटाइम गॅरेजमध्ये कामाला लागला. अवघ्या काही दिवसातच या गाण्याचा डंका आता सर्वदूर पसरलेला पाहायला मिळत आहे. मूळ खान्देशातील हे अहिराणी भाषेतलं गाणं आज सर्वदूर पोहोचलं असून अनेकांना या गाण्याने अक्षरशः वेड लावलेलं पाहायला मिळत आहे. विनोदने आजवर अनेक गाणी सादर केली आहेत. अहिराणी भाषेतील गाण्यांना ओळख मिळावी म्हणून सचिन कुमावत, विनोद कुमावत गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत घेत आहेत. या दोघांची अहिराणी भाषेतील अनेक गाणी हिट झाली आहेत. मात्र हाई झुमका वाली पोर या गाण्याने कमाल घडवून आणलेली पहायला मिळत आहे. इंस्टाग्राम, युट्युबच्या माध्यमातून गाण्याला पसंती मिळत असून अनेकांनी विनोदचं आणि गायकांचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.