गुपचूप गुपचूप हा मराठी चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रंजना आणि कुलदीप पवार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. महेश कोठारे, शुभांगी रावते, गुड्डी मारुती, अशोक सराफ, शरद तळवलकर, पद्मा चव्हाण, डॉ श्रीराम लागू. सुरेश भागवत, आशालता अशा अनेक जाणत्या कलाकारांनी त्यांना साथ दिली होती. मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही के नाईक यांनी केले होते. या चित्रपटातील पाहिले न मी तुला, हे गाणं मात्र अजरामर झालं. आजवर या चित्रपटातील बरीचशी कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या कायम भेटीला येत राहिली, तर काहींनी या जगाचा निरोप घेतलेला आहे.
आज अशाच एका अभिनेत्रीची ओळख या सदरातून करून घेऊयात. अभिनेत्री शुभांगी रावते यांनी या चित्रपटात महेश कोठारे यांच्या नायिकेची भूमिका साकारली होती. दोघेही सहाय्यक भूमिकेत असूनही, आपल्या सजग अभिनयाने प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले होते. यानंतर शुभांगी रावते फारशा कोणत्या चित्रपटात पहायला मिळाल्या नाहीत. शुभांगी रावते यांनी गुपचूप गुपचूप चित्रपटानंतर दादा कोंडके यांच्या १९८८ सालच्या मला घेऊन चला या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर १९९४ साली वो छोकरी चित्रपटात शिक्षिकेची लहानशी भूमिका साकारली होती. अशा काही मोजक्या चित्रपटातून काम केल्यानंतर शुभांगी रावते विवाहबंधनात अडकल्या. लग्नानंतर त्या शुभांगी रावते म्हात्रे अशी ओळख दाखवतात.
आदित्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा. घर संसार संभाळण्यासोबतच शुभांगी रावते नाटक, चित्रपट पाहायला जातात. काही वर्षांपूर्वी त्या आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या म्हणजेच निवेदिता सराफ यांच्या अग्गबाई सासुबाई या मालिकेच्या सेटवर हजेरी लावताना दिसल्या होत्या. त्यावेळी शुभांगी रावते पुन्हा एकदा प्रकाश झोतात आल्या होत्या. महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. महेश कोठारेसोबचा चित्रपटातील एक फोटो आणि प्रकाशन सोहळ्यातील एक फोटो शुभांगी रावते यांनी शेअर केला होता. त्यावेळी या फोटोंवर चाहत्यांनी छान छान प्रतिक्रिया दिल्या होत्या. आज शुभांगी रावते अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत, मात्र महेश कोठारे यांची नायिका म्हणून त्या कायम ओळखल्या जातील एवढे मात्र नक्की.