मी पडले म्हणून ‘दे दणादण’ हा चित्रपट हिट झाला, हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल असं कोण म्हटलं बरं. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हे विधान दुसरं तिसरं कोणी नाही तर याच चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आहे. आता असं विधान करणारी अभिनेत्री नेमकी कोण आहे, हे जाणून घेऊयात.mगेल्या अनेक दिवसांपासून झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाही’ हा कार्यक्रम नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकतेच या कार्यक्रमात दिग्गज अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली. त्यांनी नारायण देऊळगावकर यांनी दिग्दर्शित आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेला दे दणादण या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. त्यावेळी प्रेमा यांनी मजेशीर गमती जमती सांगत ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ असं वक्तव्य केलं. यासह दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्री विषयी देखील त्या बोलताना दिसल्या. प्रेमा किरण असं म्हणाल्या की, “माझा सिनेमा दे दाणादाण तुम्हाला माहीतच असेल. तो एक गोल्डन जुबली सिनेमा.” पुढे चित्रपटाविषयी सांगताना त्यातील गाण्यांची आठवण करुन देत त्यांनी ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याचे थोडे बोलही गाऊन दाखवले.

पुढे त्यांनी असं सांगितल की, “या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं अशी ताकीद दिली होती.” त्यानंतर शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. आणि अवघी दोन पावले पुढे जाऊ एवढं पुढे गेल्यावर त्यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. असे प्रेमा या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. याचाही उल्लेख त्यांनी पुढे केला. आणि त्या म्हणाल्या की, “मी पडले म्हणून दे दणादण हिट झाला.” प्रेमा यांनी आजवर या सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसह त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील अभिनय केला आहे. त्यांच्या अनेक लावण्या देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रसिध्द आहेत.
