महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जयदीप आणि गौरीच्या या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. एवढे दिवस होऊनही जयदीप आणि गौरीच्या सुखी संसारात आडकाठी ठरणारे शालिनी आणि देवकी अजूनही त्यांना त्रास देत आहेत. आता तर या मालिकेत जयदीपला वाचवण्यासाठी कोडे घालण्यात आले होते. या कोड्यांचा उलगडा करता करता प्रेक्षकांनाच नाकी नऊ आणले होते.
कुठल्याही प्रसंगात गौरी जयदीपला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करताना दाखवली आहे. देवी आई आपल्या पाठीशी आहे आणि ती आपल्याला या संकटातून वाचवते. पण जयदीप आणि गौरीवर ओढवलेली ही इतकी संकटं पाहून प्रेक्षकांनाच आता या मालिकेचा कंटाळा आला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी घुसडवून मालिकेचे कथानक लांबवण्याचा घाट घातल्याने प्रेक्षक देखील या मालिकेवर नाराज झाले आहेत. आता मालिकेच्या नव्या प्रोमोमध्येच गौरी देवीची पूजा करत असताना तिच्या साडीच्या पदराला आग लागते. तेव्हा जवळच असलेल्या माई ती आग विझवण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाहीत. त्याचवेळी जयदीप खिडकीतून उडी मारून ती आग विझवायला येतो. जयदीपची ही सततची स्टंटबाजी पाहून तर आता प्रेक्षकांनाही मालिकेची कीव करावीशी वाटत आहे.
मालिका वाढवण्यासाठी हा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आलेल्या संकटातून वाचवण्यासाठी गौरी देवीचा धावा करते. त्यामुळे मालिकेतून लोकांच्या भावनांशी खेळण्याचा घाट दाखवला जात आहे. देवीच्या नावावर वाट्टेल ते खपवणे बंद करा, आता या मालिकेत आणखी ट्विस्ट नकोत अशी तीव्र प्रतिक्रिया मालिकेच्या बाबतीत व्यक्त केल्या जात आहेत. जयदीप आणि गौरी कधीतरी सुखी संसार करताना दाखवा. आता त्यांच्या संसारात कुठलेही विघ्न न आणता मालिका संपवा अशी तीव्र इच्छा प्रेक्षकांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांनी या मालिकेत सुख शोधण्याचा प्रयत्न केला मात्र जयदीप आणि गौरीच्या या संसारात दुखाचेच सावट पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यावा अशी प्रेक्षक मागणी करत आहेत.